बारामती : महान्यूज लाईव्ह
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर बारामतीतून या जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक पदी नेमके कोण होणार? त्याची विविध स्तरातून अटकळ बांधली जात होती, आज रणजीत अशोकराव तावरे यांची या पदासाठी निवड करण्यात आली
बारामती तालुक्यातून जिल्हा बँकेच्या संचालक पदी नेमके कोणाची वर्णी लागणार याची गेले काही दिवस चर्चा सुरू होती. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या सूचनेनुसार रणजीत अशोक तावरे यांचे नाव अ वर्गातून संचालक पदासाठी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी सुचवले. त्यास आमदार दत्तात्रय भरणे यांनी सूचक तर माजी आमदार रमेश थोरात यांनी अनुमोदन दिले आणि त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
रणजीत अशोक तावरे यांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या जडणघडणीत युवकांचे स्थान महत्त्वाचे असणार असा संदेशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निमित्ताने दिला असल्याचे बोलले जात आहे.
या निवडीच्या निमित्ताने संभाजी होळकर म्हणाले, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही 300 कोटी रुपयांपासून ते आता 12000 कोटी रुपयांपर्यंत ठेवीवर पोहोचली आहे. अजित दादांनी ही बँक आशियातील नंबर एक क्रमांकाची सहकारी बँक बनवण्याचा प्रयत्न केला. बारामती तालुक्यातील आम्ही तिघेही संचालक आता शेतकऱ्यांना पूर्णपणे विविध योजनांचा लाभ देण्यासाठी व शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.











