मुंबई : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्राची महात्मा फुले जन आरोग्य योजना व केंद्र सरकारची आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजना एकत्रितरित्या महाराष्ट्रात कार्यान्वित होत आहेत. या आयुष्यमान भारत योजनेच्या महाराष्ट्राचे कक्ष प्रमुख म्हणून यापूर्वी आरोग्य क्षेत्रात काम केलेले डॉ. ओमप्रकाश शेटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता पक्षाचे प्रमुख म्हणून काम केले आहे आता त्यांची राज्य शासनाच्या सार्वजनिक विभागाने नियुक्ती केली असून राज्यातील प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांचा आरोग्याचा लाभ मिळवून देणाऱ्या योजनेत ते कक्ष प्रमुख असतील.
डॉ. शेटे यांच्या या कक्षाचा कारभार मुंबईतील वरळी येथील जीवनदायी भवन येथून चालणार आहे. राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आजपर्यंत चालवली होती. आता केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा जोड त्याला मिळणार असून, त्याद्वारे एका कुटुंबाला वार्षिक पाच लाख रुपयापर्यंत आरोग्याच्या उपचाराचा लाभ मिळणार आहे.











