कोल्हापूर : महान्यूज लाईव्ह
आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेनंतर माजी खासदार राजू शेट्टी यांनी त्यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत सुरू असलेली ऊस उत्पादकांसाठीची आक्रोश पदयात्रा थांबवली आहे.
मराठा आरक्षण चळवळीतील आपले सहकारी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आपण ही यात्रा आजपासून थांबत असल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे दरम्यान मराठा आरक्षण आंदोलनानंतर आपली पदयात्रा पुन्हा पूर्वीपासून जिथे बंद करण्यात आले तिथून सुरू करू असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी 25 ऑक्टोबर पासून तुळापूर ते नागपूर ही युवा वर्गाच्या विविध प्रश्नांवर युवा संघर्ष यात्रा सुरू केली होती. ही यात्रा सुरू केल्यानंतर तिला प्रतिसादही चांगला मिळाला, परंतु शिरूर तालुक्यातील निर्वी येथे राज्यभरातील परिस्थिती व मराठा आरक्षणातील मनोज जरांगे पाटील यांची ढासळत झालेली प्रकृती लक्षात घेत महाराष्ट्रात अस्वस्थ परिस्थिती असताना यात्रा सुरू ठेवणे योग्य नाही असे सांगत ही यात्रा थांबवली.
त्यानंतर आता राजू शेट्टी यांनी देखील त्यांची यात्रा थांबवली आहे. या दोन्ही यात्रा सामाजिक प्रश्नावर सुरू होत्या. गेल्या दोन दिवसापासून मराठा आरक्षणातील आंदोलक आक्रमक भूमिका घेऊ लागले असून राज्यभरातील राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदी करू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या इतर कोणतीही आंदोलने सुरू ठेवणे योग्य नसल्याने राजू शेट्टी यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी आपली यात्रा स्थगित करत असल्याचे ट्विट केले.











