राजेंद्र झेंडे: महान्यूज लाईव्ह
भंडारा : दिल्लीच्या अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने यावर्षी दसऱ्याला रावण दहन करणाऱ्या मंडळावर व्यक्ती व संघटनावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. रावण हा आदिवासी महात्मा राजा होता. त्याचे दहन कराल, तर यावेळी अशा व्यक्ती, मंडळ अथवा संघटनांवर जिल्हाधिकाऱ्यांनी व तेथील पोलीस यंत्रणेने गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आदिवासींच्या वतीने करण्यात आली आहे.
याची सुरुवात आदिवासी विकास परिषदेच्या भंडारा जिल्हा शाखेने केली असून भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात त्यांनी निवेदन दिले आहे. अशा व्यक्ती, मंडळ अथवा संघटनांना यावर्षी रोखले नाही, तर आम्ही आक्रोश मोर्चा काढू असे देखील आदिवासी विकास परिषदेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून दसऱ्याच्या दिवशी पारंपारिक रित्या रावणाचे जे दहन केले जाते. या प्रथेला या पुढील काळात अटकाव होण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान या निवेदनाची दखल घेऊन भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भंडारा जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी या तालुक्याच्या तहसीलदार, नगरपरिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांना तसेच गटविकास अधिकाऱ्यांना या संदर्भात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन करण्याची प्रथा आहे. मात्र रामायणात रावणाची प्रतिमा अत्यंत चुकीच्या पद्धतीने दाखवली गेली असे अनेक दाखले विविध पौराणिक अभ्यास करणारे तज्ञ तसेच गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी संघटना तसेच विविध संघटनांकडून दिले जातात. रावण आणि भगवान राम यांच्यातील युद्ध हे राजकीय युद्ध होते, तसेच रावण अत्यंत चांगला राजा होता असेही अनेकदा सांगितले जाते. त्यामुळे या पुढील काळात हाही मुद्दा ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत. दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन करण्याच्या प्रथेवर बंधन येण्याची शक्यता आहे.











