दौंड : महान्यूज लाईव्ह
मराठा समाजाला ओबीसींमधुन आरक्षण देऊ नये, धनगर समाजाच्या आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करावी, ओबीसी समाजाच्या आरक्षण वाचवण्यासाठी तसेच इतर विविध मागण्यांसाठी पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील रावणगाव येथे मेंढ्या बकरीसह ओबीसी समाजाचा तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
मागील अनेक दिवसांपासून राज्यात मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी सकल मराठा समाज करीत आहेत. मात्र ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी ओबीसी समाजाकडून होत आहे. काही दिवसांपूर्वी ओबीसी समाजाच्या वतीने चौफुला – केडगाव येथे ओबीसी समाजाची बैठक पार पडली होती. या बैठकीत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली होती.
ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली होती. त्यानुसार बुधवारी (दि २७) दौंड तालुक्यातील रावणगाव येथे ओबीसी समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील विविध गावातून ओबीसी बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनासाठी आले होते.
धनगर व ओबीसी आरक्षण कृती समितीचे प्रमुख पांडुरंग मेरगळ, ओबीसी आरक्षण चळवळीचे नेते महेश भागवत, भीमा- पाटसचे संचालक बाळासाहेब तोंडे – पाटील, माजी संचालक लक्ष्मण रांधवण, संपत आटोळे, भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष वैभव आटोळे, निवेदक अमोल धापटे, आरपीआय कार्यकर्ते नवनाथ गायकवाड, दीक्षा सांगळे, विजय गिरमे यांनी आपल्या भाषणातून धनगर व ओबीसी आरक्षणा संदर्भात आपले मते मांडली.
यावेळी सत्ताधारी प्रस्थापितांना जाब विचारत समाजाने जागृत होत आंदोलनाची धार तीव्र करण्याचे संकेत यावेळी दिले. या आंदोलनात धनगर समाजाने शेळ्या, मेंढ्या सहभागी करून पारंपारिक वाद्य वाजवत सरकारचे लक्ष वेधले. यावेळी आंदोलकांनी प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन दिले. दरम्यान, दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता.