नगर : महान्यूज लाईव्ह
घटना नगर जिल्ह्यातील शिर्डी तालुक्यातील सावळी विहीर गावातील.. पण या घटनेने इथून पुढच्या काळात तापट किंवा विकृत जावई रात्रीच्या वेळी घरात घ्यायचा का? या प्रश्नाला गांभीर्याने घ्यायला भाग पाडले. जावयाने चक्क पत्नी, मेव्हणा, सासू, सासरे, मेहुणी, आजेसासू अशा सहा जणांना भोसकले. कौटुंबिक वादातून या झालेल्या हत्याकांडात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी आहेत.
पत्नी सतत माहेरी जाते म्हणून चिडून असलेल्या जावयाने सासरवाडी गाठली आणि त्यातून हे अतिशय विकृत असे काम केले. त्याला बहुदा सासरवाडीतील सगळ्यात जणांना संपवायचे होते, असाच त्याचा इरादा होता. संगमनेर खुर्द येथील सुरेश निकम हा तो विकृत खूनी जावई.
त्याचा विवाह सावळी विहीर येथील वर्षा हिच्याशी झाला. गायकवाड कुटुंबातील वर्षा सतत माहेरी जाते याला कारण सासू-सासऱ्यांचा व सासरवाडीचा विनाकारण आपल्या संसारात वाढत चाललेला हस्तक्षेप अशी धारणा या जावयाची झाली आणि सुरेश निकमने अगोदर वर्षा हिला त्रास दिला. त्यावरून त्याची पत्नी वर्षा हिने संगमनेर पोलीस ठाण्यात सुरेश विरुद्ध तक्रार दाखल केली होती.
ही तक्रार सहन न झाल्याने सुरेशने वर्षा हिला फोन करून तातडीने सासरी परतण्याचा सल्ला दिला, मात्र वर्षा हिने प्रतिसाद न दिल्याने सुरेशने तडक सासरवाडी गाठली आणि चाकू घेऊन दिसेल त्याला भोसकण्यास सुरुवात केली. सुरेश निकम याने तब्बल सहा जणांवर वार केले. चाकूचे वार वर्मी लागल्याने वर्षा सुरेश निकम ही त्याची पत्नी, आज्जेसासू हिराबाई द्रूपद गायकवाड व मेहुणा रोहित चांगदेव गायकवाड या तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सासरे चांगदेव गायकवाड, सासू संगीता चांगदेव गायकवाड व तीस वर्षीय मेहुणी योगिता महिंद्र जाधव हे यात गंभीर जखमी झाले.