संदीप मापारी पाटील, बुलढाणा
ओरिसातील कटक शहरात एम एस सी पदवी अभ्यासक्रम शिकण्याकरता गेलेला बुलढाण्यातील सोहम सावळे हा विद्यार्थी गणपती मिरवणुकीत झेंडा फडकवताना विजेच्या तारांचा स्पर्श झेंड्याच्या ॲल्युमिनियमच्या काठीला झाल्याने जागीच मृत्यू पावला आहे. त्याच्याबरोबर त्या मिरवणुकीत सहभागी झालेले इतर चारही विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे.
डीजेवर धुंद होऊन नाचणाऱ्या अनेकांमध्येच सोहम सावळे हा देखील होता. डीजे वर चढून भगवा झेंडा फडकवत असतानाच त्याच्या अल्युमिनियमच्या काठीचा स्पर्श रस्त्यावरील आडव्या गेलेल्या विजेच्या तारांना झाल्याने सोहमचा जागीच मृत्यू झाला. त्याच वेळी सोहम बरोबर नाचणारे इतर चार विद्यार्थीही गंभीर जखमी झाले आहेत. सोहम हा बुलढाणा जिल्ह्यातील सव येथील रहिवासी आहे.
सोहम ज्या ठिकाणी शिकत होता, त्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गणेशोत्सव साजरा करताना गणपतीचे आगमन दांडगी मिरवणूक काढून करण्याचे ठरवले. त्यासाठी ट्रॅक्टर, डीजे याची देखील सोय करण्यात आली होती. ट्रॅक्टरवर लावलेल्या डीजेच्या तालात नाचत असतानाच हे मिरवणूक पुढे चालली होती आणि सोहम हा विद्यार्थ्यांकडे पाहून झेंडा नाचत होता.
त्यामुळे पुढच्या बाजूला त्याची पाठ असल्याने त्याला पुढे नेमके काय आहे ते कळलेच नाही आणि त्याचवेळी रस्त्यावरून क्रॉस झालेल्या विजेच्या तारांना त्याच्या हातातील झेंड्याच्या अल्युमिनियम काठीचा स्पर्श झाला आणि क्षणार्धात विजेचा जबरदस्त प्रवाह त्याच्या झेंड्याच्या काठीत उतरला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच बरोबर नाचणारी इतर चार विद्यार्थी देखील गंभीर जखमी झाले.











