सांगोल्यात सोशल मीडियामधील मित्रांच्या मेळाव्याचे आयोजन! भेटीगाठी, सोलापुरी खाद्यसंस्कृती, मनोरंजनासह सामाजिक उपक्रमांचा खजिना
राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअपसारख्या सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मित्रमैत्रिणींची प्रत्यक्षात भेट घडवून आणण्यासाठी पार्टी ट्रस्ट महाराष्ट्र यांच्या वतीने याहीवर्षी मित्रमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोशल मीडियावरील मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी, स्नेहभोजन, मनोरंजनपर कार्यक्रम आणि शेतकऱ्यांना सामाजिक मदत असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.
मागच्या सात वर्षांपासून पुणे, बारामती, नगर, लातूर इत्यादी वेगवेगळ्या भागात या मित्रमेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. बारामतीच्या चांडाळ चौकडीच्या करामती मालिकेतील कलाकार रामभाऊ जगताप, चला हवा येऊ द्या मालिकेतील पत्रलेखक अरविंद जगताप, शेतकरी प्रश्नांचे अभ्यासक गिरीधर पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड, इत्यादी अनेक दिग्गजांनी यापूर्वी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे.
यंदा रविवार, १ ऑक्टोबर २०२३ रोजी सांगोला (जि. सोलापूर) येथील रामकृष्ण गार्डन व्हिला याठिकाणी हा मेळावा पार पडणार आहे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या लोकांसाठी सोलापुरी खाद्यसंस्कृतीची ओळख असणाऱ्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. शाकाहारी भोजनामध्ये सोलापूरच्या करकंब येथील सुप्रसिद्ध बाजार आमटी, सांगोल्यातील मुगडाळ हलवा, लांबोटीची दही शेंगदाणा चटणी, सोलापूरच्या कडक भाकरी, व्हेज बिर्याणी, तर मांसाहारी भोजनामध्ये माणदेशी पद्धतीचे सुक्कं मटण, सोलापुरी मसाल्यातील रस्सा, चिलापी फ्राय, मसाला बिर्याणी राईस, इत्यादि पदार्थांची मेजवानी असणार आहे.
कार्यक्रमाच्या आयोजनाचा खर्च पार्टी ट्रस्ट महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात येतो, तर शाकाहारी व मांसाहारी जेवणासाठी लागणाऱ्या गोष्टी सोशल मीडियावरील मित्रमैत्रिणींच्या आर्थिक योगदानातून पार पाडले जातात. कार्यक्रमासाठी नावनोंदणी करणाऱ्यांच्या प्रवेश शुल्कामधून तसेच काही दानशूर व्यक्तींच्या योगदानातून गरजू शेतकऱ्यांना सामाजिक मदतनिधी, तसेच जालन्यातील आंतरवली सराटी गावामध्ये आंदोलनादरम्यान पोलीस लाठीहल्ल्यात जखमी झालेल्यांच्या मुलामुलींना शैक्षणिक मदत केली जाणार आहे. महाराष्ट्रातील लोकप्रिय लावणीनृत्यकार किरण कोरे याचे लावणीनृत्य, स्टॅन्डअप कॉमेडी शो, इत्यादि विविध मनोरंजनाचे कार्यक्रम देखील सादर केले जाणार आहेत.
आभासी जगतातील मित्रमैत्रिणींना एकत्र आणणाऱ्या या मित्रमेळाव्यासाठी नाममात्र २०० रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले असून नावनोंदणी करण्यासाठी https://bit.ly/Partytrust या वेबसाईटवर जाऊन आपली नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अनिल माने ९०९६२०७०३३ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.