दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
धनगर समाजाला आरक्षण व इतर मागण्यांसाठी सकल धनगर समाजाचा खंडाळ्यात एल्गार पुकारण्यात आला होता. या ठिकाणी घोषणाबाजी करित आंदोलनकर्त्यांनी सुमारे दिड तास महामर्गावर ठिय्या मांडला.
येळकोट – येळकोट जयमल्हार, आरक्षण आमच्या हक्काचं अशी घोषणाबाजी करित खंडाळा शहरात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चाला प्रारंभ झाला. घोड्याच्या पाठीवर बिऱ्हाड, मेढ्यांचा कळप घेवून मेंढपाळही मोर्चात सहभागी झाले होते.
शहरातील मुख्य रस्त्यावरून मोर्चा जात असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तर प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशव्दारासमोर पारंपारिक वेशभूषा करत गजीढोल नृत्याने ठेका धरला.
भंडाऱ्याची उधळण करत एस.टी. प्रवर्ग आरक्षण मिळालेच पाहीजे अशा घोषणा देत शेकडो आंदोलक महामार्गावर दाखल झाला अन् आशियाई महामार्गावर सुमारे दिड तास ठिय्या मांडला. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मान्यवरांकडून धनगर समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी मनोगतातून व्यक्त करण्यात आली.
या आंदोलनासाठी खंडाळा तालुक्यासह राज्यातील इतर ठिकाणाहून मोठ्याप्रमाणात सकल धनगर समाज बांधव आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षक वंदना श्रीसुंदर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, शिरवळ पोलीस ठाण्याचे फौजदार शंकर पांगारे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता