राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
अवैध अग्निशस्त्र बाळगल्याने खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणे, दहशत माजविणे अशा गुन्हयांना वाव मिळतो, ही बाब लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी अवैध अग्निशस्त्र बाळगणारे, विक्री करणारे यांचेवर कारवाई करणेचे आदेश पुणे ग्रामीण पोलीसांना दिले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी तपास पथकाला योग्य त्या सुचना देवून अवैध अग्निशस्त्र, हत्यारे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर तपास पथकाने आपापले गोपनीय बातमीदार सतर्क केले.
या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथक पौड पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हे उघडकीस आणण्याचे अनुषंगाने पिरंगुट परीसरात असताना तपास पथकातील तुषार भोईटे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, वातुंडे परीसरात बसस्थानकाजवळ दोन जण उभे असून त्यांचे जवळ गावठी पिस्तूल व काडतूसे आहेत.
ही खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली आणि वातुंडे (ता. मुळशी जि पुणे) गावच्या हद्दीतील टेमघर धरणाकडे जाणारे रोडवरील वातुंडे बस स्टॉप येथे अचानक छापा टाकला
तेथे तपास पथकाने सागर मल्लेश व्हंदमुळे (वय २५ वर्षे, सध्या रा. वातुंडे ता मुळशी जि पुणे मुळ रा भोतेवस्ती, सुसगाव ता मुळशी जि पुणे) व निलेश अशोक चौगुले (वय २६ वर्षे, रा. सुसगाव, टकसेन वस्ती, गणपती मंदिराजवळ ता मुळशी जि पुणे) यांची अंगझडती घेतली. तेव्हा प्रत्येकी दोन असे एकूण चार गावठी पिस्तूल, आठ जिवंत काडतूस, मोबाईल असा एकूण २ लाख १४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात दोन्ही इसमांवर गुन्हा नोंदविणेत आलेला आहे.
एवढया मोठया प्रमाणात अग्निशस्त्राचा साठा मिळुन आल्याने केलेल्या कारवाई बाबत वातुंडे व परीसरातील जनतेने पुणे ग्रामीण पोलीसांचे कौतुक केले असून इतर गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. अशाच प्रकारच्या कारवाया यापुढे देखील चालू राहणार असून व गुन्हेगारांवर प्रचलीत कायदया अंतर्गत कठोर कारवाई करणेत येणार आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक निरीक्षक नेताजी गंधारे, सहायक फौजदार हनुमंत पासलकर, हवालदार सचिन घाडगे, राहुल घुबे, अतुल डेरे, राजु मोमीण, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, महेश बनकर, जनार्दन शेळके, तुषार भोईटे, मुकुंद कदम यांनी केली. पुढील तपास पौड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज यादव व फौजदार योगेश जाधव हे करत आहेत.