बारामती -महान्यूज लाईव्ह
गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियात त्यांचीच वाहवा सुरू आहे, अशा तब्बल ६०० रानकवितांची मानकरी असलेल्या विमलाताई माळींनी स्वतःला कधी बोलतं केलं.. तर कधी प्राध्यापिका आश्लेषा मुंगींनी त्यांना बोलतं केलं.. अन दिवस सोनियाचे पासून मुंग्यांचा मोर्चापर्यंतच्या अनेक कविता बोलू लागल्या.
निमित्त होतं, शारदानगर येथील अप्पासाहेब पवार सभागृहात झालेल्या परिवर्तन व्याख्यानमालेचे..! यावेळी विमलताई माळी यांची प्रकट मुलाखत या व्याख्यानमालेत झाली. खुरपं नावाची आपण डीग्री घेतलीय असे म्हणणाऱ्या या आधुनिक बहिणाबाईंनी तब्बल ६०० कविता केलेल्या आहेत. त्यातील ‘रम्य निसर्ग, निसर्ग राजा, धनी माझा शेतकरी, कुठे निघुन गेले दिवस सोनियाचे, या कवितेने केले मज वेडे, मुंग्यांचा मोर्चा, अंबाबाई गीतʼ अशा निवडक कवितेंचे त्यांनी सादरीकरण केले.
खणखणीत आवाज आणि मिश्कील चालीत म्हटलेल्या कवितांना श्रोत्यांनी हशा आणि टाळयांच्या गजरात प्रतिसाद दिला. शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा असून तो अत्यावश्यक आहे. सध्या माणूसकी मोबाईल मध्ये हरवली आहे. माणूसकी नसेल तर मैत्र होऊ शकत नाही. त्यामुळे तरूणांनी समविचारी व्हावे, मैत्री करावी, तरच माणूसकी टिकेल. मुलांनी मुलींशी गुणात्मक स्पर्धा करावी, शिक्षण घ्यावे, आधुनिक शेती करावी, जोडधंदा किंवा नोकरी करावी त्यांना कोणत्याही समस्येला तोंड देताना अडचण येणार नाही. अशी मतं या आधुनिक बहिणाबाई विमलताई माळी यांनी मांडली.
परिवर्तन व्याख्यानमालेत त्यांची प्रकट मुलाखत प्रा. मुंगी यांनी घेतली. यावेळी यावेळी ट्रस्टच्या विश्वस्त सचिव सौ.सुनंदा पवार, सुभाष गुळवे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. मोहन निंबाळकर, संस्थेचे समन्वयक प्रशांत तनपुरे आदी उपस्थित होते. यावेळी बारामती परिसरातील युवक, विद्यार्थी आणि विद्यार्थिंनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी माळी यांनी आपला जीवनप्रवास व्यक्त केलाच, शिवाय उपस्थित विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन केले, त्या म्हणाल्या की, शिक्षणाशिवाय मनुष्य आंधळा होतो. दुसरीपर्यंतच माझे शिक्षण झाले, मात्र केवळ ज्ञानेश्वरीचा अभ्यास करून तसेच शालेय पुस्तकातील कविता वाचून मी कविता करायला लागले.
स्वतःचे अनुभव, शेतक-यांच्या व्यथा त्यांनी आपल्या कवितेतून मांडल्या. ‘हुंकार काळया आईचा‘ व ‘रान काव्य‘ हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. पिंपरी-चिंचवड येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील कवी कट्टयावर त्यांनी आगंतूक म्हणून प्रवेश मिळविला आणि मंचावर तब्बल २५ कविता सादर केल्या. त्यांच्या कवितांमधील वारंवार येणारे विषय म्हणजे शेतकरी आणि त्याचा जीवनसंघर्ष, निसर्ग, अंधश्रद्धा, स्त्री-पुरूष समानता, माणुसकी आणि जिव्हाळा या कविता सादर करीत असतानाच त्यांनी आपले बालपण, शिक्षण, वैवाहिक जीवनातील प्रसंग, खुमासदार पद्धतीने कथन केले. त्यासदेखील उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.











