जीवन सोनवणे : महान्यूज लाईव्ह
शिरवळ (ता. खंडाळा) येथील AK गॅंगमधील चौघांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम ( मोक्का) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
सातारा पोलीस अधिक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर लक्ष केंद्रीत करुन सराईत गुन्हेगावर, टोळीची दहशत निर्माण करुन आर्थिक व इतर फायद्याकरीता संघटीतपणे गुन्हे करणा-या गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम ( मोक्का) अन्वये प्रभावी कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर शिरवळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात फिर्यादी हे त्यांच्या ओळखीच्या मित्राकडे उसने दिलेले पैसे परत घेण्याकरीता चालत जात असताना आतिष ऊर्फ बाबु राजेंद्र कांबळे (वय २२ वर्ष रा. शिरवळ ता. खंडाळा जि.सातारा) याने मोटारसायकलवरुन फिर्यादी यांना कट मारला. फिर्यादीने त्याला विचारणा केली असता आतिष ऊर्फ बाबु राजेंद्र कांबळे याने शिवीगाळ केली व थांब तुला बघुन घेतो, तुला जिवंत सोडत नाही असे म्हणत तलवारीसारख्या लोखंडी हत्याराने मारहाण करुन जखमी केले. या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या गुन्ह्याच्या तपासामध्ये टोळी प्रमुख आतीष ऊर्फ बाबू राजेंद्र कांबळे, टोळी सदस्य विशाल शेखर वाडेकर (वय २० वर्षे रा. कावळे आळी शिरवळ ता. खंडाळा), रामा दादा मंडलिक (वय २१ वर्षे रा. सटवाई कॉलनी शिरवळ ता. खंडाळा), संजय विजय कोळी (वय २० वर्षे रा. संभाजी चौक खंडाळा, ता. खंडाळा) यांनी टोळीची दहशत निर्माण करुन आर्थिक व इतर फायद्याकरीता संघटीतपणे गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.
शिरवळचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांनी या टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती संकलित केली असता त्यांचेवर जबरदस्ती करुन, हिंसाचाराची धमकी देऊन किंवा अन्य अवैद्य मार्गाने दहशत व बळाचा वापर करणे, गंभीर दुखापत, गंभीर दुखापत करून जबरी चोरी, जबरी चोरी व जबरी चोरीचा प्रयत्न, खंडणी व जबरी चोरीसाठी गंभीर दुखापत, खुनाचा प्रयत्न, घरफोडी, चोरी अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले.
त्यावरून या आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये (मोक्का) कारवाईकरता पोलीस अधीक्षक सातारा यांच्यामार्फत कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे मोक्का अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आला.
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी सदर टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्ह्यांचे, कागदपत्रांचे अवलोकन करुन मोक्का प्रस्तावाची पडताळणी करुन सदर गुन्हयास मोक्का कायदयान्वये कलमवाढीची परवानगी देऊन गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण राहुल धस यांच्याकडे दिला.
मोक्का प्रस्ताव मंजुरी करीता पोलीस अधीक्षक समीर शेख, व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, सहाय्यक निरीक्षक केंद्रे, फौजदार सतिश अंदेलवार, शंकर पांगारे, अमित सपकाळ, जितु शिंदे, सचिन वीर, प्रशांत धुमाळ, मंगेश मोझर या पोलीस अंमलदारांनी मोक्का कारवाईकरीता सहभाग घेतला.
दरम्यान पोलिसांनी नोव्हेंबर २०२२ पासून ८ मोक्का प्रस्तावातून १०९ जणांविरुद्ध मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच २४ जणांविरुध्द हद्दपारी व एकास MPDA कायदयान्वये स्थानबध्द करण्यात आले आहे. तसेच भविष्यातही सातारा जिल्ह्यामधील सराईत गुन्हेगारांचे विरुध्द मोक्का, हद्दपारी, MPDA अशा प्रकारच्या कठोर कारवाया करण्यात येणार असल्याचे सांगितले.











