सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : शनिवारी (दि.19) पहाटेच्या दरम्यान टायटन टोळीला इंदापूर पोलिसांनी रात्रगस्तीदरम्यान रेडा- सराफवाडी (ता. इंदापूर) रस्त्यावर जेरबंद केले होते. दरोडा घालण्याच्या पूर्वतयारीत असलेल्या टोळीतील इसमांकडे पोलीस कोठडीमध्ये कसून तपास केला असता, यातील अटक आरोपींकडून दरोड्यात कामी येणाऱ्या साहित्यासह सोन्याचे दागिने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असा एकूण ३ लाख १४ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
टायटन शिवा भोसले, शामराव उर्फ जगताप काळूराम भोसले, खोपेश्वर उर्फ खोप्या शिवा भोसले आणि दिलीप सयाजी पवार हे चौघे आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले होते. तर शिवा मिट्टू भोसले हा आरोपी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाला होता.
दिलीप सयाजी पवार, रा. कटफळ रा. बारामती ता. बारामती जि. पुणे, शामराव उर्फ जगताप काळुराम भोसले, रा. पिटकेश्वर, ता. इंदापुर, जि. पुणे, खोपेश्वर उर्फ खोप्या शिवा भोसले, वय २३ वर्षे रा पिटकेश्वर ता. इंदापुर जि. पुणे, शिवा मिठ्ठु भोसले रा. पिटकेश्वर ता. इंदापुर जि. पुणे (फरार) यांनी मिळून मौजे पिठेवाडी, भगतवाडी, बावडा, निमगाव केतकी, सरस्वतीनगर, भवानीनगर परीसरा चो-या केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
त्यांच्याकडून तपासामध्ये सहा तोळे सोने, एक एल ई डी. टी. व्ही अशा एकूण 3 लाख 14 रूपये च्या किमंती मुददेमाल जप्त करून सहा घरफोडीचे खालील प्रमाणे गुन्हे उघड करण्यात आले. पिटकेश्वर (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील रहिवाशी असलेल्या या सर्व आरोपींना इंदापूर न्यायालयाने २२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
दरम्यान इंदापूर, वालचंदनगर, दौंड, नातेपुते आणि सांगोला पोलीस ठाण्यात दरोडा आणि घरफोडीसह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या या आरोपींकडून तपासादरम्यान इंदापूर तालुक्यातील आणखी सहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. यामध्ये पिठेवाडी, भगतवाडी, बावडा, निमगाव केतकी, इंदापूर शहरातील सरस्वतीनगर आणि भवानीनगर परीसरातील घरफोड्यांचा समावेश आहे.
आरोपींपैकी टायटन शिवा भोसले या आरोपीची पार्श्वभूमी अती गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची असून, त्याच्यावर वालचंदनगर (ता. इंदापूर) पोलीस ठाण्यात बलात्कार, गँगरेप आणि विनयभंगासारखे अतिगंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींची एकूणच गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि इंदापूर तालुक्यात वाढत्या चोऱ्यांच्या घटना पाहता इंदापूर पोलिसांची ही कामगिरी महत्वाची मानली जात आहे.
सदर कारवाई पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहायक पोलीस निरिक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरिक्षक सुधिर पाडुळे, सहायक पोलीस फौजदार के.बी. शिंदे, चालक हवालदार सुनिल बालगुडे, महिला पोलीस हवालदार खंडागळे, माधुरी लडकत, पोलीस नाईक अमोल गायकवाड, सुनिल कदम, कळसाईत, पोलीस शिपाई विनोद लोखंडे, आरीफ सय्यद, अकबर शेख, विशाल चौधर, सुधिर शेळके, दिनेश चोरमले यांनी मिळून केल्याचे पोलिसांनी सांगितले.