बारामती : महान्यूज लाईव्ह
पाऊस न झाल्याने आणि खंडीत वीजपुरवठ्यामुळे जळून गेलेल्या ऊसाचे त्वरीत पंचनामे करून प्रति एकरी पन्नास हजाराची नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी कष्टकरी शेतकरी समितीने केली आहे. या संदर्भातील निवेदन आज बारामती, इंदापूरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे आज शेतकऱ्यांकडून देण्यात आले.
माळेगाव, सोमेश्वर आणि भवानीनगर या साखर कारखान्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र आहे. यावर्षी पाऊन न झाल्याने तसेच खंडीत वीज पुरवठ्यामुळे ३० ते ३५ टक्के क्षेत्र पाण्याअभावी पुर्ण जळून गेले आहे. सोसायटी आणि बॅंकांचे कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर फार मोठे संकट उभे राहिले आहे. तरी संबधित विभागामार्फत त्वरीत पंचनामे करून एकरी ५० हजार रुपये जळालेल्या ऊसाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी असे या निवेदनात म्हणले आहे. सदर निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी श्री. नावडकर यांनी दिले. कष्टकरी शेतकरी संघटनेच्या अरविंद बनसोडे, दशरथ राऊत, विक्रम कोकरे, अमीत जगताप, विजय देवकाते, पोपट निगडे आणि अजय देवकाते यांनी हे निवेदन दिले