कोल्हापूर – महान्यूज लाईव्ह
शिक्षण संस्थेत शिक्षक असलेल्या महिलेची वेतनवाढ रोखण्याची भिती दाखवत संस्थेच्या इमारतीच्या भाड्यासाठी १ लाखांची मागणी करणाऱ्या शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष, मुख्याध्यापकासह शिपायाचीही पैशाची हाव शिक्षिकेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मदतीने उतरवली.
कोल्हापूर जिल्ह्यातील ही घटना आहे. शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती येथील संजीवनी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अण्णासाहेब विभुते विद्या मंदिर शाळेतील शिक्षिकेला संस्थेचा अध्यक्ष अजित सूर्यवंशी हा इमारतीच्या भाड्याची एप्रिल महिन्यातील ९५ हजार ५७७ रुपयांची मागणी करीत होता.
ही लाचेची मागणी केल्यानंतर शिक्षिकेने ही रक्कम देण्यास असमर्थता दाखवल्याने या शिक्षिकेची वेतनवाढ रोखण्याबाबत शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार करण्याची भिती अध्यक्ष सूर्यवंशी याने दाखली. त्यावरून शिक्षिकेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.
या तक्रारीची पडताळणी एसीबीने केली, तेव्हा संबंधित लाचेची मागणी अध्यक्ष सूर्यवंशी केली, ती रक्कम मुख्याध्यापक महावीर पाटील याच्याकडे देण्याची सूचना केल्यानंतर संबंधित रक्कम मुख्याध्यापकाने शिपाई अनिल टकले याच्याकडे देण्याची सूचना केली.
लाचेची रक्कम घेताना अनिल टकले यास रंगेहात पकडले. मात्र यातील सहआरोपी असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अध्यक्ष सूर्यवंशी व मुख्याध्यापकाला ताब्यात घेतले व जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधिक्षक शीतल जानवे-खराडे, विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधिक्षक सरदार नाळे, फौजदार संजीव बंबरगेकर, प्रकाश भंडारे, पूनम पाटील, सचिन पाटील, रुपेश माने, सुनील घोसाळकर, विकास माने, संदिप पवार, रुपेश माने यांच्या पथकाने केली.