बसस्थानकावरील पोलीस मदत केंद्र फक्त दिखावा.! चोरीच्या अनेक घटना घडल्या, मात्र उपाययोजना नाहीच..!!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर बसस्थानकावर सतत होणाऱ्या चो-यांमुळे प्रवाशांनी धसका घेतला आहे. चोरीचे हक्काचे आणि खात्रीशीर ठिकाण म्हणूनच की काय चोरट्यांकडून चलाखीने प्रवाशांच्या चो-या पध्दतशीर चालू आहेत.शनिवारी (१९ ऑगस्ट )रोजी महिला प्रवाशाच्या बॅगेतून ११ तोळे सोने चोरीला गेले आणि चोरांनी इंदापूर बसस्थानकावर कायद्याचे नाही तर आमचेच राज्य आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केले.
हे बसस्थानक चोरीसाठी खात्रीशीर केंद्र बनल्याने बसस्थानकावरील कायम बंद असलेले पोलीस मदत केंद्र सुरु करुन शातीर चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. बसस्थानकावर एसटीमध्ये चढत असताना एका महिला प्रवाशाच्या बॅगेतील जवळपास ११ तोळे सोन्यावर चोरट्यांनी हात मारला.
शनिवारी (१९ ऑगस्ट) सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास घडली .या प्रकारासंदर्भात आनुजा चिन्मय देशपांडे (रा.मेन पेठ, इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी ह्या आपले पती आणि सासऱ्यांसह बार्शी (जि. सोलापूर) या गावी निघाल्या होत्या.
यावेळी एसटीमध्ये चढत असताना त्यांच्या बॅगेतील साडेतीन लाखांच्या आसपास किंमतीचे ११ तोळे सोने चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत लंपास केले. यामध्ये सोन्याच्या बांगड्या, गळ्यातील डोरले, सोन्याचे नेकलेस, सोन्याचे गंठण आणि सोन्याच्या पदकाचा समावेश आहे. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी बस स्थानकातील सीसीटिव्ही तपासले.मात्र आतापर्यंत च्या चोरीच्या घटनांमध्ये आरोपी सापडले नाहीत, त्यामुळे या चोरीचा तपास लागणार का? हा सवाल आहे.
इंदापूर पोलिसांची आरोपींना पकडण्याची कामगिरी चांगली आहे. यामध्ये ८ जून रोजी बस स्थानकातील एटीएम फोडीचा आणि ६ जुलै रोजीच्या सरडेवाडी खून प्रकरणाचा तपास कौतुकास्पद आहे. परंतु बस स्थानकातील चोऱ्या रोखण्यात इंदापूर पोलीसांना यश का येत नाही असा सवाल नागरिक प्रवाशांचा आहे.
इंदापूर बस स्थानकातून प्रवास करणे प्रवाशांच्या, विशेषतः महिला प्रवाशांच्या लुटीचे कारण ठरत आहे. मात्र इंदापूर एसटी प्रशासन यावर ठोस उपाययोजना करताना दिसत नाही. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसस्थानकात पोलीस मदत केंद्र असूनही मात्र तेथे पोलीस कर्मचाऱ्याचा अभाव आहे. बसस्थानकात एक कायम पोलीस नेमल्यास चोरट्यांमध्ये धाक बसू शकेल असे सर्वसामान्यांचे मत आहे.