विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर नेहमीच बारामतीच्या दौऱ्यावर असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीला फिरकले नाहीत. त्यामुळे बारामतीमध्ये विविध चर्चांना उधान आले आहे. काल पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांना पत्रकारांनी पुन्हा एकदा हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितले…
दादा, तुम्ही दर आठवड्यातून किमान एक दिवस बारामतीला जात होता. महायुतीत आल्यानंतर इतके दिवस बारामतीला गेला नाही? हा तो प्रश्न होता. या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले.. मी दर आठवड्याला बारामतीला विरोधी पक्ष नेता असताना जात होतो. विरोधी पक्षनेता असताना कामाचा भार आणि उपमुख्यमंत्री म्हणून कामाचा भार याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आज मी उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय.
कधीकधी मी सकाळी साडेसहाला कामाला सुरुवात करतो आणि उशिरापर्यंत काम करतोय. शेवटी प्रश्न सुटले पाहिजेत. मी बारामतीतल्या तिथल्या प्रमुखांशी, अधिकाऱ्यांशी संपर्कामध्ये आहे आणि लवकरच मी बारामतीला जाणार आहे. कारण बारामतीकरांमुळे मी इथे आलो आहे. मी आज जे काही तुमच्याशी बोलू शकतो. ते बारामतीकरांचे आशीर्वाद, बारामतीकरांचे प्रेम, बारामतीकरांचा भरभक्कम पाठिंबा, राज्यामध्ये पहिल्या क्रमांकाच्या मताधिक्याने निवडून देण्याचं त्यांचं कसब आणि सगळ्या विरोधकांचं डिपॉझिट जप्त करण्याची त्यांची किमया हे सगळं त्यांचच काम आहे. त्याच्यामुळे नेहमी बारामतीकरांना माझा सॅल्यूट आहे.मी बारामतीला जाणारच आहे.
कधी जाणार आहे? या दुसऱ्या प्रश्नावर बोलताना अजित पवार बोलताना मिश्कीलपणे म्हणाले.. बारामतीला जाईल त्यावेळेस तुला नक्की सांगेन. दोन महिन्याचा कालावधी साधारणतः लोटला आहे, यावर बोलताना अजित पवार म्हणाले, दोन महिने नाही एक महिना वीस दिवसाचा कालावधी लोटला आहे. असे अजित पवार म्हणाले.