बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील अर्बनग्राम शेजारच्या देवकाते पार्क येथे 21 एप्रिल रोजी घडलेल्या धाडसी दरोड्यातील उकल झाल्यानंतर आता नवनवे मुद्दे पुढे येत आहेत. या दरोड्यात फिर्यादीच्या सांगण्यानुसार 60 लाख 97 हजार रुपयांची रोख रक्कम समाविष्ट आहे, आता दरोडेखोराकडून काही रक्कम पोलीस पथकाने हस्तगत केली असली, तरीसुद्धा या रकमेच्या वैधतेसाठी फिर्यादीला आयकर खात्याच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
चार महिन्यांपूर्वी हा दरोडा जेव्हा पडला, त्याच वेळी अनेकांना अनेक प्रश्न पडले होते. आज पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना जेव्हा पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, आयकर खात्याच्या चौकशीनंतर त्यांच्या ना हरकत प्रमाणपत्रानंतर न्यायालयीन प्रक्रियेतून फिर्यादीने फिर्यादीमध्ये नमूद केलेली रोकड रक्कम त्याला मिळू शकते. अर्थात त्यासाठी आयकर खात्याच्या चौकशीला फिर्यादीला सामोरे जावे लागेल आणि आम्ही यासंदर्भात आयकर खात्याला कळवणार आहोत. आमच्या दृष्टीने तपासाचा भाग एवढाच की, फिर्यादीची एवढी रक्कम चोरीला गेली आणि तपासात एवढी रक्कम हस्तगत केली गेली.
दरम्यान नोटाबंदीनंतर दोन लाख रुपयांपेक्षा अधिकचे रोख व्यवहार करण्यास केंद्र सरकारने बंधन घातलेले आहे. अशावेळी कोणताही व्यवहार असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम संबंधित फिर्यादीने घरात ठेवली कशी? हा प्रश्न दरोडा पडला, त्यावेळेस विचारला जात होता, मात्र दरोडेखोर सापडत नाहीत, तोपर्यंत पुढील गोष्टींना तितकेसे महत्व नव्हते हे यापूर्वीच पोलिसांनी अप्रत्यक्षरीत्या स्पष्ट केले होते.
आता दरोडेखोर सापडले आहेत. दरोड्यात चोरीला गेलेल्या ऐवजापैकी काही प्रमाणात मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागलेला आहे. अशावेळी जी रोख रक्कम आहे, त्याचा आयकर चुकता केलेला आहे किंवा कसे याची चौकशी आयकर विभाग करू शकते. त्यासाठी पोलिसांकडून आयकर विभागाला याची माहिती दिली जाते, त्यामुळे यापुढील चौकशी आयकर विभागाकडून केली जाणार आहे.
साहजिकच एकीकडे आरोपींची म्हणजे दरोडेखोरांची चौकशी पोलीस करतील, तर फिर्यादीची या रोख रकमेच्या मालकीसंदर्भातील रितसर चौकशी आयकर विभाग करेल असे या दरोड्यातील घटनेनंतरचे बारकावे स्पष्ट झाले आहेत. बारामतीतील जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारातील रक्कम असल्याचे पहिल्यापासून सांगितले जात असल्याने, ही रक्कम कशी वैध आहे, हे फिर्यादीला आयकर विभागाला पटवून द्यावे लागणार आहे. त्यामुळे या दरोड्यातील घटनेची उकल झाली असली, तरी याचा उत्तरार्ध मात्र अजूनही बाकी आहे.