बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील अर्बनग्राम शेजारच्या देवकाते पार्क या इमारतीत 21 एप्रिल रोजी झालेल्या धाडसी दरोड्यात जे दरोडेखोर सापडले आहेत, ते रेकॉर्ड वरचे गुन्हेगार नाहीत हे विशेष; मात्र त्यांनी मुहूर्त काढून दरोडा घातला हे मात्र सत्य आहे. अन् त्यामागेही एक मोठी कहाणी दडलेली आहे.
बारामतीतील देवकाते पार्क येथे सागर गोफणे यांच्या घरात रात्रीच्या साडेआठ वाजण्याच्या सुमारास घुसून त्यांच्या पत्नी तृप्ती गोफणे यांचे हातपाय बांधून दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकला. तब्बल एक कोटी सात लाख चोवीस हजार तीनशे रुपयांचा ऐवज यामध्ये चोरीला गेला होता. ही घटना अत्यंत खळबळजनक होती, त्याहीपेक्षा या घटनेत रोकड प्रचंड मोठी असल्याने आणि याची चर्चा राज्यभर झाल्याने पोलिसांपुढे ते एक आव्हान बनले.
हा दरोडा जेव्हा पोलिसांनी उघडकीस आणला, तेव्हा या दरोड्यातील सर्व गुन्हेगार हे पहिल्यांदाच दरोडा घालणारे होते, हे समोर आल्याने सारे जण चक्रावले आहेत. हे सर्वजण खाजगी कंपन्यांमध्ये नोकरीला आहेत व होते. दरोडा घडल्यानंतर या ठिकाणी एक बूट आढळून आला आणि हा बूट एका बारामती शेजारच्या औद्योगिक कंपनीतील कामगारांसाठी वापरला जातो अशी माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी त्या दिशेने देखील आपला तपास वळवला होता.
आता सगळ्यात शेवटी त्याच कंपनीतील दोघेजण ज्यांनी काही दिवस आधी कंपनीतील काम सोडले होते, ते या प्रकरणातील सूत्रधार आहेत हे स्पष्ट झाले. गंमत म्हणजे हा दरोडा चक्क मुहूर्त काढून घातला गेला होता हे समोर आल्याने याची चर्चा आता आणखीच जास्त झाली आहे. आजपर्यंत लग्न, गृहप्रवेश, बांधकाम, नवीन बियाणे लागवड, एवढेच काय विहीर खोदताना, बोअर घेताना, घर बांधताना, गाडी घेताना देखील मुहूर्त पाहण्याची अनेकांना सवय आहे. मात्र चोरी करताना मुहूर्त पाण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी.
अर्थात यातील ज्योतिषी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे, तो फलटण तालुक्यातील अंधरुड गावचा रामचंद्र चव्हाण हा असून त्याने सुरुवातीला अशा प्रकारचा मुहूर्त करण्यास नकार दिला होता अशी माहिती पुढे आली आहे. मात्र जेव्हा नितीन मोरे या दरोडेखोराने त्याला गळ घातली, तेव्हा चव्हाण याने 21 एप्रिलच्या दरम्यानचा मुहूर्त सांगितला आणि हा मुहूर्त सांगताना सागर गोफणे घरी नसेल याची काळजी घेण्याचा सल्ला त्याने दिला होता अशी देखील माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते.
रामचंद्र चव्हाण याने दोन ते तीन मुहूर्त काढले अशी माहिती या तपासात पुढे आली असून जेव्हा दरोडा घातला, त्यानंतर दरोड्यांमध्ये मिळालेली रक्कम आपापसात वाटताना मोरे याने अत्यंत विश्वासू व पारदर्शकपणा दाखवत या सर्वांकडून म्हणजे चौघा जणांकडून समान हिश्याने ज्योतिषाचे देखील पैसे काढले आणि रामचंद्र चव्हाण याला तब्बल आठ लाख रुपये दिल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.
अर्थात या ज्योतिषाची ताकद दिसली नाही, असे नाही, कारण तब्बल चार महिने पोलीस या प्रकरणात तपासावर आणि मागावर होते. तोपर्यंत तरी नक्कीच त्याची पॉवर टिकली, असेही आता गमतीने बोलले जात आहे. सारे पैसे पोलिसांनी काही क्षणातच बाहेर काढले त्यामुळे त्याला हा पापाचा माल अजिबातच पचला नाही. पोलिसांनी त्याच्याकडीलही काही रक्कम हस्तगत केली आहे.
अर्थात रामचंद्र चव्हाण याची आत्ताची अवस्था लक्षात घेता, या पुढील काळात कोणी ज्योतिषी, देवऋषी किंवा माहितगार, अंगात देव येणारा कोणी भोंदू असेल, तो यापुढे अशा प्रकारचे मुहूर्त काढून देईलच याची शाश्वती उरली नाही. अर्थात तरीही यापुढील काळात असे मूहूर्त निघणारच नाहीत असेही होणार नाही. मात्र चोरीसाठी मुहूर्त काढण्याचा पहिलाच मुहूर्त चुकला असे मानता येईल.