बारामती: महान्यूज लाईव्ह
येथील आचार्य अकॅडमीमध्ये स्मार्ट गर्ल अभियानाचा शुभारंभ येथील मुलींच्या विभागात तक्रार आणि सुचना पेटीची सुरुवात करून संपन्न झाला. बारामती येथील रागिणी फौंडेशन यांच्या वतीने आचार्य अकॅडमी येथे हे अभियान सुरु झाले आहे. या कार्यक्रमासाठी निर्भया पथकाच्या प्रमुख पोलिस हवालदार अमृता भोईटे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
पोस्को कायदा, स्वसंरक्षण, विद्यार्थीदशेत असताना विद्यार्थ्यांची कर्तव्य आणि जबाबदारी,निर्भया पथकाचे कामकाज, ध्यान, मदतीसाठी ११२ हेल्पलाईन क्रमांकचा वापर कसा करावा,सोशल मीडियाचा वापर अशा अनेक विषयांवर यावेळी अमृता भोईटे यांनी मुलींना मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींच्या सक्रिय सहभागामुळे अर्ध्या तासासाठीचा हा नियोजित कार्यक्रम जवळपास दोन तासाहून जास्त काळ चालला.
शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थिनींना स्वसंरक्षण धडे मिळावेत,आपल्या जबाबदाऱ्याची जाणीव व्हावी, शैक्षणिक प्रगती बरोबरच विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास व्हावा, भविष्यात एक सुजाण नागरिक घडव्यात याकरिता त्यांना स्मार्ट गर्ल अभियानाच्या माध्यमातून आरोग्य, समुपदेशन, मार्गदर्शन आवश्यक कायद्याची माहिती मिळावी या अनुषंगाने हे अभियान सुरु करण्यात आले आहे. वर्षभर या अभियानाच्या माध्यमातून विविध विषयावर मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती रागिणी फाऊंडेशनच्या अध्यक्षा राजश्री आगम यांनी दिली.
आचार्य अकॅडमीचे संचालक ज्ञानेश्वर मुटकुळे यांच्या मार्गदर्शनात हे अभियान यापुढे कार्यरत राहणार आहे. या कार्यक्रमासाठी आचार्य अकॅडमीच्या साधना दळवी आणि सुजाता शेळके यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.