बारामती : महान्यूज लाईव्ह
नागपंचमीचा पतंग भलेही कोणाला आनंद देत असेल मुलांना आनंद देत असेल किंवा त्यांच्या पालकांना आनंद देत असेल, परंतु हा क्षणिक आनंद सर्वसामान्य आणि निष्पाप प्रवाशांच्या मात्र जीवावर बेततोय. बारामती, इंदापूरात मागच्या दोन दिवसात तब्बल नऊ जणांना नायलॉन मांजाने जखमी केले आहे. या संदर्भात नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेत, पोलीस कारवाई करायचे ते करतील पण बारामतीत नगरपालिकेनेदेखील सात जणांचे पथक तयार केलं आहे, मात्र तरीदेखील मांजाची भीती कमी होणार का? हा प्रश्न मात्र सामान्य प्रवाशांना सतावतो आहे.
बारामती इंदापूर रस्त्यावरील बांदलवाडी येथे काटेवाडीतील प्रवाशाला गळ्याला मांजा कापला. त्यानंतर बारामती शहरात फिरत असलेल्या महिलेची बोटे कापली. काल बारामती शहरात मांजा कापल्यानंतर जखमी होऊन उपचारासाठी दाखल झालेल्यांची माहिती उपलब्ध नाही, मात्र सिल्व्हर जुबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले करावागज येथील वैभव खरात व अंजना खरात आणि बारामती शहरातील महेश चव्हाण या मांजामुळे किरकोळ जखमी झालेल्या नागरिकांवर उपचार करण्यात आल्याची माहिती डॉक्टर महेश जगताप यांनी दिली.
दरम्यान बारामती, इंदापूरात सध्या फिरणेही मुश्किल झाले असल्याची भीती नागरिकांमध्ये असून, बारामतीच नाही, तर आसपासच्या भागातही हीच भीती प्रवाशांमध्ये आहे. कधी कोणत्या रस्त्यावर नायलॉन मांजा आडवा येईल आणि आपल्या गळ्याभोवती गुंडाळला जाईल, याची शाश्वतीच नसल्यामुळे नागरिक देखील दबक्या पावलानेच प्रवास करत आहेत.
काल फलटण येथील एका नागरिकाला गळ्याला मांजा लागून गळा कापला गेल्याचे दृश्य मोबाईल धारकाच्या मोबाईल मधून सोशल मीडियात व्हायरल झाले आणि सगळीकडे पुन्हा भीती पसरली. शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र देवरे यांनी नगरपालिकेकडे यासंदर्भात कठोर कारवाईची मागणी केली. दरम्यान बारामतीत नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी नगरपालिकेच्या सात अधिकाऱ्यांचे पथक तयार केले असून हे पथक प्रत्येक दुकानात जाऊन मांजाची तपासणी करेल, तसेच परिसरात उडणाऱ्या पतंगावरही नजर ठेवेल अशा स्वरूपाचा आदेश मुख्याधिकाऱ्यांनी दिला आहे.
बारामतीत नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, अजय लालबिगे, रणजीत अहिवळे, बळवंत झुंज, परशुराम घोलप, निखिल शीलवंत, संजय गडीयल या सात जणांची नियुक्ती नायलॉन मांजाच्या बंदोबस्तासाठी केली आहे. बारामती प्रमाणेच इतरही नगरपालिका तसेच ग्रामपंचायती देखील आपापल्या भागात अशा प्रकारच्या पथकांची नियुक्ती करू शकतील. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची त्यांनाही अधिकार आहेत, मात्र आपल्या भागातील नागरिकांच्या जीविताची काळजी घेण्यासाठी त्यांच्याकडे इच्छाशक्ती असली पाहिजे.
पोरांचे लाड करा, पण दुसऱ्यांच्या जीवितावर उठण्याचा अधिकार कोणाला आहे?
पतंग उडवायला विरोध कोणाचा असण्याचे कारण नाही, पण त्यासाठी नायलॉन मांजाचाच आग्रह का? विशेषत: आपल्या घरातील मुले नेमका कोणता मांजा वापरतात किंवा दोर वापरतात, यावर घरातील पालकांचे लक्ष असले पाहिजे. किंबहुना ज्याप्रमाणे अल्पवयीन मुलाला वाहन चालवण्यास दिल्यानंतर त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल होतो, तशाच प्रकारची कारवाई पोलिसांनी संबंधित मुलांच्या पालकावर करायलाच हवी, त्याखेरीज हे लोण कमी होणार नाही.
आपल्या मुलाचा लाड करताना दुसऱ्याच्या जीवितावर उठण्याचा आपल्याला अजिबात अधिकार नाही याची खबरदारी पालकांनी घ्यावी, तसेच जे दुकानदार चोरून नायलॉन मांजा आणतात, त्यांनीही आपली जबाबदारी समजून घ्यायला हवी. कारण ज्या पद्धतीची कृती आपण करत आहोत, त्यातून कोणाच्या तरी जीविताचे नुकसान होणार आहे आणि त्याहीपेक्षा त्या कुटुंबातील कर्ता पुरुष यामध्ये जीवाला मुकला, तर त्या कुटुंबाचे कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे. दौंड शहरात मागील वर्षीची अशीच घटना घडली होती. ज्यातून त्या कुटुंबाला पुन्हा उत्तर प्रदेशला जावे लागले. त्यामुळे पालक आणि दुकानदारांचीही यामध्ये जबाबदारी आहे. ती जबाबदारी नैतिकदृष्ट्या पाळण्याची खबरदारी सर्वांनीच घ्यावी