महिलेचे पाय बांधले आणि तब्बल एक कोटी रुपयांचा ऐवज देवकातेनगरमधून नेला! तब्बल चार महिन्यांनी बारामतीतील एक कोटी रुपयांची चोरी उघडकीस!
बारामती : महान्यूज लाईव्ह
चार महिन्यापूर्वी बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील देवकातेनगर येथील सागर शिवाजी गोफणे यांच्या घरी, त्यांच्या पत्नी तृप्ती यांचे हातपाय बांधून रात्रीच्या आठ वाजता दरोडेखोराने तब्बल 95 लाख 30 हजार रुपये रोख रक्कम, वीस तोळे वजनाचे 11 लाख 59 हजार 300 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 35 हजार रुपयांचे तीन मोबाईल असा एकूण एक कोटी सात लाख 24 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.
तब्बल चार महिन्यानंतर ही चोरी उघडकीस आली असून महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चोरीसाठी ज्योतिषाकडून मुहूर्त काढला गेला होता अशी धक्कादायक माहिती मिळाली आहे. हा धाडसी दरोडा घालणारे गुन्हेगार हे एमआयडीसीतील मजूर कामगार असल्याची माहिती पुढे आली असून, पोलिसांनी केलेल्या या कारवाईत सचिन अशोक जगधने (वय 30 वर्ष व्यवसाय नोकरी राहणार गुणवडी 29 फाटा जिल्हा परिषद शाळेजवळ तालुका बारामती), रायबा तानाजी चव्हाण (वय 32 वर्ष व्यावसाय : चालक राहणार शेटफळ हवेली जाधव वस्ती कॅनॉल जवळ तालुका इंदापूर), रवींद्र शिवाजी भोसले (वय 27 वर्ष व्यवसाय नोकरी निरावागज घाडगेवाडी रोड भोसले वस्ती पाण्याच्या टाकीजवळ तालुका बारामती), दुर्योधन उर्फ दीपक उर्फ पप्पू धनाजी जाधव (वय 35 वर्ष व्यवसाय नोकरी राहणार जिंती हायस्कूल जवळ तालुका फलटण) आणि नितीन अर्जुन मोरे (वय 36 वर्ष व्यवसाय खाजगी नोकरी राहणार धर्मपुरी तालुका माळशिरस) यांना याप्रकरणी ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल ही पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक निरीक्षक नेताजी गंधारे, राहुल गावडे, अभिजीत सावंत, प्रदीप चौधरी, शिवाजी ननवरे, अमित सिद्ध पाटील, गणेश जगदाळे, रविराज कोकरे, बाळासाहेब कारंडे, सचिन घाडगे, ज्ञानेश्वर शिरसागर, अजित भुजबळ, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, राजू मोमीन, अतुल ढेरे, चंद्रकांत जाधव, मंगेश तिकडे, तुषार बंधारे, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, दीपक साबळे, विक्रम तापकीर, विजय कांचन, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, तुषार भोईटे, संदीप वारे, धीरज जाधव, अक्षय नवले, मंगेश भगत, मुकुंद कदम, प्रमोद नवले, दगडू विरकर, अक्षय सुपे यांच्या पथकाने केली असून पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, फौजदार राजेश माळी व दीपक दराडे करत आहेत.
चार महिन्यांपूर्वी घडला दरोडा!
ही घटना 21 एप्रिल 2023 रोजी अर्बनग्राम शेजारच्या देवकातेनगर येथे घडली होती. तृप्ती सागर गोफणे या त्यांच्या लहान मुलांसह घरात असताना चार अनोळखी चोरट्यांनी घराच्या कंपाउंड भिंतीवरून आज प्रवेश केला तृप्ती गोफणे यांना मारहाण करून त्यांचे हातपाय बांधून त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला व घरात प्रवेश केला.
एक कोटी सात लाख 24 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेला. बारामती शहरातील लोकवस्तीत हा प्रकार घडल्याने सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते व बारामती शहरात खळबळ उडवून दिली होती. तसेच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील याविषयी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर पोलिसांनी अत्यंत गांभीर्यानं आणि युद्ध पातळीवर तपासाला सुरुवात केली होती.
सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय बातमीदार, तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत गुन्हा उघडकीस आणण्यासाठी एक दीर्घव्यापी योजना पोलिसांनी तयार केली होती. आणि यामध्ये यातील प्रमुख आरोपी हे एमआयडीसीत काम करणारे मजूर असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अधिक काळजी घेत हा तपास केला.
दरोड्याचं कारण काय? ज्योतिषाचा संबंध काय?
सागर गोफणे हा जमीन विक्रीचा व्यवसाय करत असून त्याचे जवळ भरपूर पैसे असल्याची माहिती सचिन जगधने याला मिळाली होती. त्यांनी गुन्ह्याचा कट रचना हा गुण्याचा कट करण्यापूर्वी आरोपींनी रामचंद्र वामन चव्हाण हा फलटण तालुक्यातील आंदरूड येथील ज्योतिषी असून त्याच्याकडून गुन्हा करण्यासाठी मुहूर्त काढून त्याच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा केला अशी माहिती देखील यामधून मिळाली.
आतापर्यंत संबंधित आरोपींकडून 76 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये 60 लाख 97 हजार रुपयांची रोकड, 15 लाख 35 हजार 410 रुपयांचे 26 तोळे सोने जप्त करण्यात आलेले आहेत.