बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीत एकाच दिवशी 16 ठिकाणी घरफोडी केल्याची घटना घडल्यानंतर, पुन्हा दुसऱ्या दिवशी सातव चौकातही एक घटना घडली होती. ज्यामध्ये सहा लाख 90 हजार रुपयांचे दागिने चोरीस गेले होते. यानंतर सतर्क झालेल्या बारामती पोलिसांनी थेट सगळीकडे नाकाबंदी केली.
दुपारच्या वेळी घडलेली घटना असल्याने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेच्या आधारे शहरातून बाहेर पडू पाहत असलेल्या चोरट्यांना हेरले आणि त्यांचा पाठलाग सुरू केला. यानंतर अगदी उसाच्या शेतात जाऊन लपलेल्या चोरट्यांना देखील पोलिसांनी बाहेर काढले आणि त्यांना ताब्यात घेऊन अटक केली.
अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक गंधारे, फौजदार अमित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, बारामती शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील फौजदार युवराज घोडके व गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या घटनेची थोडक्यात हाकिकत अशी, सातव चौकातील रम्यनगर येथे राहणारे चरणसिंग किसन चव्हाण यांच्या राहत्या घरातून 14 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट च्या दरम्यान चोरट्यांनी घरफोडी केली. यामध्ये तब्बल सहा लाख 90 हजार रुपयांचे दागिने, यातच पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली होती.
याबाबत चव्हाण यांनी फिर्याद दाखल करताच पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या सूचनेनुसार वरील पथकाने नाकाबंदी करत चोरट्यांना हेरले व हेमंत उर्फ बारक्या बड्या पवार (वय 32 वर्ष राहणार जामदार रोड बारामती), कुत्या रमेश पवार (वय 32 वर्ष राहणार जामदार रोड बारामती), सुमित आदित्य पवार (व 22 वर्ष राहणार माळेगाव तालुका बारामती), विजय देख्या भोसले (वय 20 वर्ष रा. जामदार रोड शिवाजीनगर) यांना ताब्यात घेतले. त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.