विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी बारामती मध्ये पत्रकारांशी संवाद साधला. बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर चित्र वेगळेच आहे. अजितदादांबरोबर तेच कार्यकर्ते, शरद पवार यांच्याबरोबरही तेच कार्यकर्ते, आणि आपल्याबरोबरही तेच कार्यकर्ते दिसताहेत, त्यामुळे संभ्रम तयार होतोय असा प्रश्न पत्रकारांनी विचारला.
या प्रश्नावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, हा संभ्रमाचा विषय नाही, आज हा आमचा दिवसभराचा आमचा कौटुंबिक कार्यक्रम आहे. इथली विकास कामाची पाहणी, बारामतीतल्या काही कुटुंबाच्या भेटीगाठी आहेत, त्यासाठी मी बारामतीला आले आहे. इथले कार्यकर्ते पवार कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे असं दृश्य तुम्हाला इथे दिसले. कुणीही चुकीचा किंवा वेगळा अर्थ काढू नये.
बारामती, इंदापूर, दौंड या मतदारसंघात आपण एकाकी पडला आहे असं वाटतंय का? यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामती हे माझं माहेर आहे आणि माझी कर्मभूमी आहे आणि लोक माझ्याबरोबर आहेत. आणि राहतील एवढाच माझा प्रयत्न आहे. माझं इथलं राजकारण हे समाजकारण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे नेहमीच मी फक्त लोकसभेचे तिकीट मागितलेले आहे, मी राजकारणात तीन कामांसाठी आलेली आहे. राजकारणात सेवेसाठी आली आहे. लोकांचा, शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी आली आहे. आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आली आहे.
त्याच्यामुळे मी इथली सेवक म्हणून गेली पंधरा वर्षे बारामती मतदारसंघातल्या लोकांनी मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांची आयुष्यभर ऋणी राहील आणि सातत्याने या भागाचा सर्वांगीण विकास कसा होईल आणि महाराष्ट्रातल्या काही कामांचा पाठपुरावा असेल. दिल्लीतील लोकसभेतील परफॉर्मन्स माझे काम तुम्ही बघतच आहात. त्याच्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाची आन-बान शान ही सातत्याने पहिल्या नंबरवरच राहील, याच्यासाठी माझ्याकडून नेहमीच प्रयत्न होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काही विचारांमध्ये अंतर आले आहे, त्याच्यात पवार कुटुंबाचा काही संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे पवार कुटुंब नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेल्या २४ वर्षांमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी प्रचंड कष्ट केले, पक्षावर प्रेम केले, महाराष्ट्राची सेवा केली. देशाची सेवा केली, त्यामुळे हा कौटुंबिक विषय असं नाही. कारण का? तर या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहोत, कुटुंबाचा याच्याशी त्याचा काही संबंध नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काही घटकाला असं वाटतं की, वेगळ्या वैचारिक विचारांबरोबर त्यांनी जावं आणि काही लोकांचे मत यापेक्षा वेगळे आहे. त्याच्यामुळे हे काही वैयक्तिक मतभेद नाहीत, हे वैचारिक मतभेद आहेत आणि त्याच्यात काही गैर नाही. सगळेच मतभेद हे वैचारिक मतभेद आहेत, हे मनभेद नाहीत.
अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून बारामती मध्ये आले नाहीत, की, मुख्यमंत्री म्हणूनच बारामतीत येणार या प्रश्नावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी ही टीव्हीवरच बघते. अजितदादा रोज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतात. त्याच्यामुळे ते लवकर नक्कीच बारामतीला येतील. कारण शासन आपल्या दारी व अनेक कार्यक्रम आहेत. काही दिल्लीलाही कार्यक्रम होते. दिल्लीलाही गेलेले टीव्हीवर दिसलेलं आहे. त्याच्यामुळे माझा विश्वास आहे, अजितदादा लवकरच बारामतीला येतील.
जो जिंकेल त्याची जागा असं संजय राऊत म्हणाले आहेत, यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, इंडिया मध्ये जेव्हा जागावाटप होईल. अर्थातच देशपातळीवर सर्वे होईल, चर्चा होईल आणि जिथून जे जे जिंकू शकतील, ज्यांच्याकडे चांगले उमेदवार असतील तशाच पद्धतीने हे जागावाटप होईल.
आपण ५२ दिवसानंतर बारामतीला आला आहात. बारामतीच्या जनतेला काय आपण आवाहन करणार? यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एक तर बारामती माझं माहेर आहे. तशी माझी कर्मभूमी आहे. आज माझी महाराष्ट्रात आणि देशात जी काही ओळख झाली आहे, ती बारामतीच्या मायबाप जनतेमुळे आहे. त्यामुळे माझ्या कर्तव्य, प्रेम, आधार सगळा बारामतीचा आहे. त्यामुळे संपर्क ठेवण्यासाठी काही अडचण नाही.
आजकाल तंत्रज्ञानामुळे टीव्ही, मोबाईल, सोशल मीडिया एवढ्या पद्धतीने काम करता येतात. या ५२ दिवसांपैकी ३० दिवस मी दिल्लीला पार्लमेंट मध्ये होते आणि पार्लमेंटमध्ये मणिपूर मध्ये जी घटना झाली.त्याचे तीव्र पडसाद संपूर्ण देशामध्ये उमटले आणि 30 दिवस पार्लमेंट मध्ये सातत्याने मणिपूर, महिलांवर होणारे अन्याय, महागाई जी आज सर्वसामान्य जनतेपुढे सर्वात मोठा आव्हान आहे. बेरोजगारी आणि महागाई या सगळ्या विषयांमध्ये 30 दिवस मी दिल्लीमध्ये होते आणि बारामती व महाराष्ट्रासाठी लढतच होते असे सुप्रिया सुळे बारामती मध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.