बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती शहरातील देसाई इस्टेट परिसरात क्रीडा संकुल शेजारच्या पाच अपार्टमेंट पहाटेच्या वेळी चोरट्याने लक्ष्य केल्या. चोरट्यांची एक अख्खी टोळीच या ठिकाणी चारचाकी गाडीतून आली होती. त्यांनी तब्बल १६ घरे फोडली यातील बहुतांश घरे बंद होती परंतु या १६ घरांपैकी दोन घरांतील तब्बल २५ तोळे सोने व एक लाख रुपये लंपास केले आहेत.
बारामतीत पहिल्यांदा अशाप्रकारे चोरट्यांनी सामूहिकरित्या मोठ्या प्रमाणावर चोरी करण्याची पहिली घटना आहे. त्यामुळे बारामती शहरात नागरिकांसह पोलिसांनाही धक्का बसला. दरम्यान या घटनेतील काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज देखील मिळाले असून, त्या आधारे पोलीस पथक याचा तपास करत आहे.
शहरातील क्रीडा संकुल च्या भागात या चोऱ्या करण्यात आल्या असून, या १६ चोऱ्या ५ अपार्टमेंटमध्ये करण्यात आल्या, यामध्ये बहुतांश घरे ही बंद अवस्थेत होती. परंतु पाच घरामधील कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी तब्बल २५ डोळे सोन्या-चांदीचे दागिने आणि एक लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.
गुरुवारी पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास एका मोटारीतून आलेल्या पाच ते सहा जणांच्या टोळीने येथील जिल्हा क्रीडा संकुल नजीक असणाऱ्या पाच अपार्टमेंट मधील १६ सदनिकांचे कडी कोयंडे तोडून घरफोड्या केल्या. दरम्यान अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
दरम्यान चोरटे व गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या गाडीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांनी दिली. घरफोड्या झालेल्या सदनिकांपैकी १३ सदनिका बंद अवस्थेतील आहेत. पैकी ५ सदनिकांमध्ये २५ तोळे सोने, चांदी चोरीला गेल्याचेही भोईटे यांनी सांगितले.