लवकरच इंदापूर शहरासह तालुक्यातील गुन्हेगारांवर मोठी कारवाई होणार असल्याचे पोलीस निरीक्षकांनी दिले संकेत..!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर
इंदापूर शहरात कत्तलखान्यात बेकायदेशीरपणे जनावरांची कत्तल करणाऱ्यांवर पोलीस खात्याने धडक कारवाई केली. कसलाही परवाना नसताना जनावरांची बेकायदेशीरपणे कत्तल करणा-या इंदापूर शहरातील पाच जणांच्या टोळीला एक वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे.
इंदापूर शहर व तालुक्यातील अनेक गुन्हेगार यांच्यावरही लवकरच मोठी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली आहे. शहर व तालुक्यातील गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी इंदापूर पोलीस अलर्ट झाल्याचे दिसत असून याबाबत पोलीस खात्याकडून कारवाई होण्यासाठी पाठपुरावाही सुरू असल्याचे समजते.
कारवाई करण्यात आलेल्या तडीपारीमध्ये टोळीप्रमुख रज्जाक ईस्माईल बेपारी (वर ५२ , रा. कुरेशीगल्ली, इंदापूर), अरफात राज्जाक कुरेशी (वय २१, रा. कुरेशीगल्ली, इंदापूर),इमरान जब्बार बेपारी (वय ३५, रा. कुरेशीगल्ली, इंदापूर),शाहीद शब्बीर कुरेशी (वय ३२, रा. कुरेशीगल्ली, इंदापूर),अक्रम रशीद कुरेशी (वय २१, रा. कुरेशीगल्ली, इंदापूर ) यांचा समावेश आहे.
याबाबत इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले की, इंदापूर शहरातील पाच जणांच्या टोळीने संगणमताने शहरातील कुरेशीगल्ली येथे त्याचप्रमाणे आसपासच्या परिसरात कोणताही शासकीय परवाना नसताना तसेच त्यांच्याकडे कत्तल केलेले प्राणी, जीवंतप्राणी हे प्रजननक्षम नसलेबाबत किंवा शेतीच्या मशागतीसाठी उपयोग नसल्याचे संबंधीत प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र नसताना बेकायदेशीरपणे जनावरांची कत्तल करताना आढळून आले.
त्यांच्या विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण तसेच पशु क्रुरता अधिनियम अन्वये चार गुन्हे दाखल असल्याने त्यांचे विरोधात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ प्रमाणे कारवाई होण्यासाठी प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे पाठवण्यात आला होता. त्यानुसार या पाचही जणांना पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. पुणे शहर आयुक्तालय, पिंपरी चिंचवड आयुक्तालय, तसेच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुका, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस व माढा तालुका असा हद्दपारीचा आदेश करण्यात आला आहे.
ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आदेशानुसार रज्जाक ईस्माईल बेपारी, अरफात राज्जाक कुरेशी, इमरान जब्बार बेपारी, शाहीद शब्बीर कुरेशी, अक्रम रशीद कुरेशी यांना तात्काळ ताब्यात घेऊन इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि.१६ ऑगस्ट २०२३ रोजी सोडण्यात आले. इंदापूर शहरासह तालुक्यातील अनेक गुन्हेगार थोड्याच दिवसात तडीपार होणार असल्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले.