राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील भीमा नदीपट्ट्यात व बागायती भागात बिबट्यांची संख्या वाढत चालली आहे. दौंडच्या पूर्व भागानंतर आता पुन्हा बिबट्याने नानगाव येथील एका शेतकऱ्यांच्या घरासमोरील बदकाची शिकार केली. दरम्यान, बिबट्याची ही शिकार सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झाली आहे.
घरासमोरील पटांगणात शिकार शोधताना खुलेआम बिनधास्तपणे होत असलेला वावर हा परिसरातील शेतकरी व नागरिकांसाठी भीतीदायक बनला आहे. दौंड तालुक्यातील पूर्व भागातील शिरापूर, राजेगाव, मलठण नायगाव या भागात काही दिवसांपूर्वीच अनेक शेतकऱ्यांना शेतामध्ये बिबट्याचे दर्शन घडले होते, तसेच दौंड तालुक्यातील उंडवडी येथे रात्रीच्या सुमारात काही शेतकऱ्यांना शेतांमध्ये बिबट्याचे दर्शन घडल्याने त्यांनी आपल्या मोबाईल मध्ये व्हिडिओ काढला होता.
ही घटना ताजी असतानाच आता १६ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजता नानगाव येथील गणेशरोड परिसरात संजय रणदिवे यांच्या घरासमोर बिबट्या शिकारीच्या शोधासाठी आल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यामुळे या परिसरात शेतकरी, नागरिक व महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रणदिवे यांच्या घरासमोर बिबट्या आला, त्याने बिनधास्तपणे फेरफटका मारला, मग घरासमोरून बिबट्याने एक बदक पाहिले, त्याची शिकार करूनच बिबट्याने तिथून पलायन केले. नानगाव परिसरात मागील काही दिवसांपासून कुठे ना कुठेतरी बिबट्या शेतकऱ्यांच्या निदर्शनात येत आहे. काही दिवसापूर्वीच मांगोबामाळ परिसरातील खळदकर वस्ती येथील शेतमजुरावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना होती.
आता संजय रणदिवे यांच्या घरासमोर बिबट्याने बदकाची शिकार केल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. दरम्यान, दौंड तालुक्यात बिबट्याची कुटुंबे दिवसेंदिवस वाढत असताना वन विभाग मात्र या घटनांकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे एकंदरीत चित्र आहे. भीमा नदीकाठाच्या गावातून, ग्रामपंचायत व शेतकऱ्यांकडून पिंजरा लावण्याची मागणी वन विभागाकडे रोज होत असताना वनविभाग कशात गुंतला आहे असा प्रश्न शेतकरी वर्ग विचारत आहेत. बिबट्याने आतापर्यंत शेतकऱ्यांच्या पाळीव शेळ्या मेंढ्या व इतर जनावरे यांच्यावर हल्ला केला आहे, मात्र वन विभाग हा बिबट्याकडून माणसावर हल्ला करण्याची वाट पाहत आहेत का ? असा सवालही नागरिक उपस्थित करीत आहेत.