लक्ष्मण जगताप, बारामती
आपल्या आजूबाजूचे वातावरण मुलांच्या शैक्षणिक विकासास पूरक नाही, मुले पालकांचे ऐकत नाहीत, मुलांना चांगले वळण व शिस्त नाही, जवळपास उत्तम शिक्षणाची सुविधा नाही. अशा अनेक कारणामुळे पालक आपल्या पाल्याला लहान वयातच निवासी शाळेत अथवा वसतिगृहात ठेवतात. जेणेकरुन त्याला चांगले शिक्षण मिळेल. त्याचे आयुष्य चांगले घडू शकेल. असा विचार या मागील असतो.परंतु कधीकधी अशा निर्णयामुळे मुलांच्या मनावर विपरित परिणाम होतो.ज्या हेतूने असा निर्णय घेतलेला असतो त्याच्या उलट घडलेले दिसून येते.
दहा अकरा वर्षाच्या लहान मुलांना आईवडील, बहिणभाऊ, घरातील अन्य नातेवाईक यांच्या समवेत राहण्यात सुरक्षित आणि आनंदी वाटते. कुटुंबाच्या बाहेर राहण्यात त्यांना असुरक्षित वाटते. त्यामुळे आईवडीलांना सोडून वसतिगृहात राहण्याची त्यांची मानसिक तयारी नसते आणि जरी मुले बाहेर राहिली, तरी त्यांची शैक्षणिक प्रगती होईल का याची खात्री नसते. कारण मुल जरी शरीराने बाहेर राहत असले तरी त्याचे मन आईवडील, कुटुंब यात गुंतलेले असते.अशा ठिकाणी राहण्यात त्याला आनंद वाटत नाही. ते मनातून निराश आणि खिन्न होते.आईवडीलांनी ठेवले म्हणून किंवा आईवडीलांच्या इच्छेखातर ते राहत असते.
त्यामुळे असा निर्णय घेताना पालकांनी खूप विचारपूर्वक निर्णय घ्यावा. मुलांच्या आयुष्याला वळण देणारा हा निर्णय असतो, म्हणून आपल्या पाल्याचा मनाचा विचार करावा.. त्याला विश्वासात घ्यावे. त्यांच्याशी संवाद साधावा. त्याचे मन जाणून घ्यावे. त्याला विचार करण्यास वेळ द्यावा. जर त्याने आनंदी मनाने बाहेर राहण्यास होकार दिला, तरच त्याच्या संमतीने असा निर्णय घ्यावा. अन्यथा असा निर्णय घेऊच नका. याला काही मुले अपवाद असू शकतील.
मुले वयाने थोडी मोठी होतात, त्यावेळी त्यांना समज यायला सुरूवात होते. शिक्षणासाठी बाहेर रहावे लागते हे त्यांना समजावून द्या. त्यांना स्वावलंबी बनायला मदत करा. त्यांना स्वतः ची कामे करायची सवय लावा. त्यांची मनाची तयारी तरच बाहेर ठेवण्याचा निर्णय घेऊ शकता. अन्यथा असा निर्णय घेऊ नका. हल्लीच्या काळात शिक्षणाबाबत पालक जागरुक आणि खूप दक्ष आहेत. अनेक सक्सेस मुलांच्या स्टो-या ऐकून आपल्या पाल्याबाबत असा प्रयोग करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यात स्वतः चे आणि पाल्याचे नुकसान करुन घेतात.
प्रत्येक मुलाची स्वभाववैशिष्टे वेगवेगळी असतात. ठराविक शाळेत किंवा ठराविक ठिकाणी ठेवल्यावरच आपल्या मुलाचे आयुष्य घडणार आहे हे प्रथम पालकांनी मनातून काढून टाकावे. घरी राहूनही आपल्या परिसरातील शाळेत शिक्षण घेऊन आयुष्य उत्तम घडू शकते. यासाठी आपण मुलांना वेळ दिला पाहिजे. मुलांच्या अभ्यासातील अडचणी जाणून त्यांना मदत केली पाहिजे.
शाळा आणि शिक्षकांशी नियमित संपर्क ठेवावा. शिक्षकांशी चर्चा करुन पाल्याच्या उणिवा व चांगल्या बाबी माहित करुन घ्याव्यात. आपल्या पाल्याचे मित्र – मैत्रिणी कोण आहेत त्यांच्या पाल्याच्या चांगल्या वाईट सवयी कोणत्या याकडेही बारकाईने लक्ष असायला हवे.
आपल्या घरातील वातावरण, मुलांची बुद्धिमत्ता, अभ्यासाची गोडी, मुलांनी मनापासून घेतलेली मेहनत, शाळा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन, मित्र-मैत्रिणींचा सहवास, पालक म्हणून मुलांसाठी दिलेले संस्कार आणि वेळ या सगळ्यांच्या गोळाबेरीजेतून मुले आपल्या परिसरातूनच घडत असतात. (लेखक शिक्षक आहेत. संपर्क : 9423249996)