राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दूध उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी व दुधाची भेसळ थांबवण्यासाठी तात्काळ निर्णय घेण्याची मागणी रयत क्रांती संघटनेचे राज्याचे प्रवक्ते भानुदास शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असून राज्यातील दूध संस्था व चालकांची ईडी व स्थानिक तपास यंत्रणांच्या माध्यमातून चौकशी करावी व दूध उत्पादकांची पिळवणूक थांबवावी अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.
या संदर्भात शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले असून त्यामध्ये नमूद केल्यानुसार, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रयत क्रांती संघटना व शेतकरी यांनी मागील महिन्यात दूध आंदोलन केले होते. याची दखल घेऊन राज्य सरकारने ३.५ फॅट व ८.५ एस एन एफ ला ३४ रुपये दुधाचे दर बंधनकारक केले, परंतु नेहमीप्रमाणे दूध संस्थाचालक यांनी दुधाचा एस एन एफ कमी दाखवून ०.१ टक्क्याला १ रुपया कमी करून पुन्हा शेतकऱ्यांची लूट चालू केली आहे.
३४ रुपये दुधाच्या दरासाठी ३ फॅट व एस एन एफ ८ करावा, अन्यथा गाईच्या दुधाला आहे त्या फॅट व एस एन एफ ला ५० रुपये दर बंधनकारक करावा.
कारण दुधासारखे अमृत तयार करणाऱ्या शेतकऱ्यांना संस्थाचालक लुटत आहेत, त्यामुळे याबाबत योग्य निर्णय होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे १४ कोटी लिटर दूध उत्पादन क्षमता असताना ६४ कोटी लिटर दुधाची विक्री होत आहे. याचा अर्थ ७० ते ८० टक्के दूध हे भेसळयुक्त आहे. त्यामुळे ग्राहकांना विकतचे दुखणे खरेदी करावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाचे पैसे थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे बंधनकारक करावे. त्यामुळे खरे दूध उत्पादक शेतकरी व वास्तवातील दूध यांचा ताळमेळ बसेल व खरी माहिती पुढे येईल. त्याचप्रमाणे शेती व्यवसायामधील सर्वात मोठा दूध धंदा ची एकदा ईडीमार्फत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळे वास्तव समोर येईल व दुसऱ्या बाजूला भेसळीलाही आळा बसून शेतकऱ्यांना योग्य असा बाजार भाव मिळेल. त्यामुळे वरील विषयावरती त्वरित निर्णय होणे गरजेचे आहे असे त्यांनी नमूद केले आहे.