राजा माने, संपादक, राजकीय विश्लेषक व माध्यम तज्ज्ञ. सदस्य, महाराष्ट्र शासन शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समिती.
मी साधारण दहा वर्षांचा असेन तेव्हाची ही घटना. श्रावण महिन्यात नागपंचमी दिवशी आमच्या बुरुड गल्लीपासून जवळच असलेल्या टिळक चौक परिसरातील नागोबा मंदिरा जवळ भली मोठी जत्रा भरायची. छोटी सर्कस, पाळणे, खाद्य पदार्थ मनोरंजनाच्या जथ्यांसह सर्व प्रकारच्या दुकानांनी जत्रा सजायची. जत्रेत सहभागी होणाऱ्या आणि नागोबा मंदिरात जाणाऱ्या भाविकांसाठी बार्शी शहरातून जत्रेच्या ठिकाणी जाणारा प्रमुख रस्ता आमच्या बुरुड गल्लीतून असायचा.
त्यामुळे गल्लीतील काही मुले जत्रेची संधी साधून गोळ्या-बिस्किटे, खारेमुरे, फिरक्या, मसाला सुपारी, बुरुड कलाकुसरीने तयार केलेल्या दुरड्या या सारख्या वस्तू जत्रेत फिरुन ओरडत, रस्त्याच्या कडेला बसून विकून चार पैसे मिळवायची. नागोबाच्या जत्रेची चर्चा सुरु झाली आणि मलाही जत्रेत काही तरी एक दिवसाचा धंदा करुन चार पैसे कमविण्याची खुमखुमी आली!
खरे तर जत्रेत धंदा करणारी मुले माझ्यापेक्षा मोठी होती. त्यांच्या तुलनेत मी शरीराने व वयानेही लहान शाळकरी मुलगा होतो. पण माझी धडपड मात्र मोठ्यांच्या बरोबरीची असायची. घरची परिस्थिती अर्थातच हालाखीची. माझे वडिल बापू बार्शीच्या लोकमान्य सूत गिरणीत कामगार! आई अक्का काही श्रीमंत घरी धुणं-भाडी करायची. उदरनिर्वाहाचा कुटुंबाचा संघर्ष सुरु असतानाच नागोबाच्या जत्रेत एक दिवसाचा धंदा करण्याची माझी इच्छा अक्काला अजिबात आवडली नाही. तरीही मी हट्ट सोडला नाही.
शेवटी माझा हट्ट बघून अक्का वैतागूनच मला म्हणाली,”जत्रंत फिरुन काय ईकणार हायस तू? त्याच्यासाठी पैशे कुठून आणणार? बिगर भांडवली काय करायचं असलं तर कर!” अक्काच्या या सांगण्यानंतर माझा बिगर भांडवली धंद्याचा शोध सुरु झाला. जत्रा चार दिवसांवर आली असताना मला चहा विकण्याचा धंदा सुचला! मी अक्काला तसे सांगितले. चहा विकण्याचा धंदा बिगर भांडवली कसा? तर मी अक्काला त्यांचे गणित सांगितले. चहा तयार करायचं भगुणं आपल्या घरातलं, स्टोव्ह शेजारच्या वाडकर अक्काकडून एक दिवसासाठी आणायचा, दूध सुरवस्यांच्या छबनकाकूंकडून उधार घ्यायचे, साखर,चहापत्ती, रॉकेल गल्लीतल्या नागाअण्णा माळवाल्यांच्या किराणा दुकानातून उधार घ्यायचे आणि नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी सगळ्यांचे हिशोब चुकते करायचे!
अक्काला माझ्या या बिगर भांडवली धंद्याची कल्पना तिची इच्छा नसताना माझ्या हट्टापायी स्वीकारावी लागली.मी तयारीला लागलो. नागपंचमीच्या दिवशी मी सकाळी लवकर जावून टिळक चौकातील कोल्हाळे केशकर्तनालयासमोर एका कोपऱ्यात छोटीशी जागा पक्की केली. दुपारी तीन नंतर जत्रेतील गर्दीला बहर येतो त्यामुळे मी दुपारी दोन वाजता दुकानाची मांडामांड केली.तीन वाजता स्टोव्हमध्ये हवा मारुन स्टोव्ह पेटवला आणि चहाचं भगुणं स्टोव्हवर चढवलं. चहा तय्यार झाला.
चमच्यात चहा घेवून त्यांची चव बघितली. माझ्या आवडीनुसार चहा फक्कड झाल्याचा आनंद झाला. पहिला कप धरणीमातेला ही श्रद्धा म्हणून पहिला कपभर चहा तिथेच बाजूला जमिनीवर ओतला, नमस्कार करुन चहा विक्रीला सुरुवात केली. गिऱ्हाईकांना गरमागरम आणि कडक चहा मिळाला म्हणून भगुण्यात तयार केलेला चहा मोठ्या केटलीत ओतला आणि चहा उकळत रहावा म्हणून ती केटली स्टोव्हवर ठेवली.
शेजारीच कपबशा धुण्यासाठी पाण्याची बादली ठेवली. येणाऱ्या जाणाऱ्यांना चहा घेण्याची विनंती करु लागलो.चांगला प्रतिसाद मिळू लागल्याने मी खुश होवून अधिक उत्साहाने कामाला लागलो. सर्वकाही माझ्या मनासारखे घडत असतानाच एका क्षणी मी कपबशी धुण्यासाठी शेजारी ठेवलेल्या बादलीकडे वाकलो असतानाच माझ्या पाठीवर गरम काहीतरी सांडत असल्याने भाजत असल्याने घाबरुन अक्षरशः किंचाळलो! त्याक्षणी मागे वळून पाहिले तर आमच्या गल्लीतला गुंड दादा अंत्याने (अनंत) स्टोव्हवरील उकळत्या चहाची केटली त्याच्या हातात घेतली होती आणि उकळत्या चहाची धार माझ्या पाठीवर लावली होतो.
भाज्यांच्या वेदना असह्य होत असल्याने मी भांबावून, रडत, बोंबलत जत्रेच्या गर्दीत पळत सुटलो. अंत्याने उकळत्या चहाची माझ्या पाठीवरील धार चालूच ठेवून तसाच पाठलाग करत होता. ती धार चुकविण्यासाठी मी विव्हळत,रडत होता. अंत्या मात्र केटलीतील चहा संपेपर्यंत ओततच राहिला. केटलीतील चहा संपला. अंत्या एखाद्या विजेत्याच्या थाटात मलाच शिव्या हासडत निघून गेला. मी माझ्या त्या धंद्याच्या ठिकाणीच जीवघेण्या वेदनांसह रडत, विव्हळत बसलो. एव्हाना अक्काला घडला प्रकार समजला आणि ती माझ्याकडे धावली.
मला लगेचच उपचारासाठी डॉ. नाना सामनगांवकरांच्या दवाखान्यात नेण्यात आले. अक्काने तिथेच माझा शर्ट काढला. माझ्या वेदना पाहून अक्काला रडू कोसळले. माझ्यावर उपचार सुरु झाले. पुढे काही दिवस मला विना शर्ट रहावे लागले. अंत्याने माझ्या पाठीवर उकळत्या चहाची धार का लावली? या प्रश्नाचे उत्तरही मिळाले. जत्रेत छोटा-मोठा धंदा करण्याची अंत्याची परवानगी घ्यायची हा दादागिरीचा रिवाज होता. मी मात्र तो रिवाज पाळला नव्हता, म्हणून मला ती सजा! पुढे जीवनभर पत्रकारितेत ज्या ज्या वेळी जळीत प्रकरणे माझ्या समोर आली तेव्हा तेव्हा काळजात चर्र झाले.
एक न अनेक अशा असंख्य प्रसंगात अक्का माझ्याच नव्हे तर तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिली.आज तिला जावून तीन वर्षे झाली. तिच्या अखेरच्या दिवसात तर अक्का मी आणि माझा परिवार कुठेही गेलो तरी अक्का सोबतच असायची. चार वर्षांपूर्वी कोल्हापुरा मी, माझी पत्नी सौ.मंदा, जावई तेजस राऊत, कन्या सौ.शिल्पा, नात सारा व नातू अर्जून डी. वाय.पी.मॉलला गेलो होतो. तेव्हाही अक्का व्हीलचेअरवर बसून आम्हा सर्वांच्या आनंदात सहभागी झाली होती.