सोलापूर : महान्यूज लाईव्ह
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात शेतकरी कुटुंबात वेगवेगळ्या घटना मागील दोन वर्षात घडल्या आता नव्याने घडलेली घटना ही भारत धक्कादायक आहे डाळिंबाच्या बागेला फवारणी करत असताना ट्रॅक्टरच्या ब्लोअर मध्ये साडीचा पदर अडकला आणि 29 वर्षीय पत्नीचा पतीसमोरच गळफास बसून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील अजनाळे गावात घडली.
रविवारी दुपारच्या वेळी ही घटना घडली. या घटनेत प्रियांका प्रवीण येलपले या 29 वर्षीय महिला शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रवीण व प्रियंका हे दोघेजण रविवारी डाळिंब बागेत ट्रॅक्टरला जोडलेल्या ब्लोअर युनिटच्या सहाय्याने डाळिंबाच्या झाडांना विद्राव्य खत देत होते.
प्रवीण हे ट्रॅक्टर चालवत होते, तर प्रियंका या झाडांच्या आळ्यामध्ये हे विद्राव्य खत सोडत होत्या. हे खत सोडत असतानाच प्रियंका यांच्या साडीचा पदर ट्रॅक्टरच्या ब्लोअरच्या रॉडला अडकला आणि या ब्लोअरच्या पंख्यामुळे प्रियांका यांना गळफास बसला.
प्रियंका यांना हा गळफास एवढ्या जलद बसला की, त्यांना मदतीसाठी हाकही मारता आली नाही, मात्र ट्रॅक्टर जाम होताच प्रवीण यांनी पाहिले आणि तातडीने ट्रॅक्टर थांबवून प्रियंकाच्या गळ्याला बसलेला साडीचा गळफास काढला. उपचाराकरता सांगोला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, प्रियांका यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.