दौंड : महान्यूज लाईव्ह
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस येथे आलिशान गाडीत गावठी पिस्तूल, कोयते, कटवणे या हत्यारासह दरोड्याच्या तयारीत असलेली सराईत दरोडेखोरांची टोळी पाटस व यवत पोलिसांनी जेरबंद केली आहे.
यवत पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पाटस दुरक्षेत्राच्या हद्दीत शनिवारी ( दि १२) पहाटे ४ : २० वाजण्याच्या आसपास पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रोडवर असलेल्या तलावाच्या बाजूला एका गाडीत संशयास्पद काही लोकं निदर्शनास आली. त्यांची सखोल चौकशी करीत गाडीची तपासणी केली असता त्यांच्या गाडीत गावठी पिस्तूल, काडतुसे, कटावणी आदी हत्यारे आढळून आली.
याप्रकरणी पोलिसांनी दत्ता अशोक शिंदे ( वय २८ रा. राहू ता. दौंड जि. पुणे), सचिन लक्ष्मण भोसले (वय ३९ रा. आष्टी ता. आष्टी जि. बीड), सचिन संतोष बेलदार (वय २१ रा. येवला ता. येवला जि. नाशिक ), मल्हार अंबादास अडागळे (वय २४ रा. रवळगाव ता.कर्जत जि. अहमदनगर ) यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एक गावठी पिस्टल, काडतुस, कोयता, कटावणी, चार चाकी वाहनासह ४ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या टोळीतील मामा उर्फ मैत्रीण रिकेबी (रा.कुर्डुवाडी ता. माढा जि. सोलापूर ) हा पळून गेला आहे. ताब्यात घेतलेल्या दरोडेखोरांवर यवत पोलीस ठाण्यात यापूर्वीही गुन्हे दाखल असुन ते फरारी आरोपी आहेत. या आरोपींकडे प्राथमिक चौकशी केली असता सदर आरोपींनी यवत पोलीस स्टेशन, शिरूर, मिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीत डीपी चोरीचे गुन्हे केलेचे कबूली दिली आहे. तसेच या आरोपींनी जास्तीत जास्त गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याची शक्यता असून त्या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल , बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, महिला पोलीस उपनिरीक्षक मीरा मटाले, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस हवालदार संजय देवकाते, निलेश कदम, गुरूनाथ गायकवाड, अक्षय यादव, रामदास जगताप,अजित काळे, मेघराज जगताप, प्रमोद गायकवाड, महेंद्र चांदणे, राजीव शिंदे, मारूती बाराते, समीर भालेराव आदींनी या सराईत दरोडेखोरांची टोळी जेरबंद करण्याची कामगिरी केली . दरम्यान, पाटस व यवत पोलीसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांनी कौतुक केले आहे.