सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील सराफवाडी समृद्धीच्या बाबतीत आणि सौंदर्याच्या बाबतीत हे गाव नेहमीच अग्रेसर असते. नव्याचा स्वीकार करणारी इथली नवी पिढी आणि सातत्याने नाविन्याच्या शोधातील इथले शेतकरी, यामुळे त्यामुळे सराफवाडीने दुष्काळी परिस्थितीवर मात करायला सुरुवात केली आणि हळूहळू सराफवाडी चे चित्र बदलू लागले आहे.
याच सराफवाडीतील स्वप्निल अंबादास शिंदे या युवकाची ही कहाणी! फार्मासिस्ट पदवी घेतलेल्या स्वप्निल चे गावात मेडिकल दुकाने आहे, परंतु कुटुंबाचा पारंपारिक धंदा असलेल्या दूध व्यवसायात त्याने लक्ष घातले. घरची 15 एकर शेती आहे. या शेतीत गुरांसाठी ही चारा केला जातो, तर त्याच्या गोठ्यात आता 25 गायी आहेत.
दीडशे दोनशे लिटर दिवसाला दूध उत्पादन होते, मात्र त्याच्या लक्षात आले की, फक्त डेअरीला दूध घालणे परवडत नाही, शिवाय सातत्याने दरातील चढ-उताराचा सामना करावा लागतो. त्यापेक्षा त्याच्यावर जर आपण प्रक्रिया केली, तरच आपल्याला हा धंदा परवडेल. मग त्याने घरच्या घरी दीडशे ते दोनशे लिटर दुधाची प्रक्रिया करायला सुरुवात केली. त्यापासून सुरुवातीला खवा तयार केला.
या खव्याचे मार्केटिंग शोधायला त्याला खूप यातायात करावी लागली. मात्र त्यांचा जम बसला. त्याचे थोरले भाऊ मार्केटिंग करतात. आज स्वप्निल कडे गोठ्यातील 25 गायांपासून मिळणारे 150 ते 200 लिटर दूध आहेच, शिवाय त्यांनी एक बल्क कुलर चालवायला घेतला असून, त्या बल्क कुलर मधून तो दिवसाला चांगल्या प्रतीचे सहाशे लिटर दूध घेऊन प्रक्रिया करतो.
अर्थात सध्या बाजारातील दुधाचा शेतकऱ्यांना मिळणारा दर हा कमाल म्हणजे 3.5/8.5 या प्रमाणकास 34 रुपये लिटर आहे. स्वप्निल हा या दूध उत्पादकांना 36 रुपयापर्यंत दर देतो आणि त्यांचे 36 रुपयांनी घेतलेले दूध त्याच्या स्वतःच्या प्रक्रिया उद्योगात प्रक्रिया करतो. दिवसाला 130 किलो खवा तो बनवतो, तसेच त्याने कृष्णा नावाने पेढ्याचा ब्रँड तसेच मावा कुल्फीचा ब्रँड बनवला आहे. या पेढ्याची मागणी सर्वदूर आहे. त्याचा खवा हा पुणे, सातारा, सोलापूर, नगर या जिल्ह्यात खपतो.
स्वप्निल ने सांगितले, मार्केटिंग हे ज्याचे त्याला शोधावे लागेल, मात्र खव्याचे मार्केटिंग आणि खव्याचे बाजारपेठ प्रचंड मोठी आहे. या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांना सुरुवातीला स्वतः काही अडचणी येतील, परंतु जर त्यांनी पाय रोवून घट्टपणे या व्यवसायात नाळ रुजवली, तर त्यांना काहीच कमी पडणार नाही, हा माझा स्वतःचा अनुभव आहे.
मला वर्षासाठी 30 ते 36 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असून, त्यामध्ये खर्च देखील समाविष्ट आहे, परंतु जर मी फक्त दूध डेअरीला घातले असते, तर आजच्या बाजारभावानुसार फक्त 32 ते 34 रुपये दर मिळाला असता. परंतु त्यावर प्रक्रिया केल्याने दोन पैसे जास्त मिळत आहेत आणि हा धंदा देखील परवडू लागला आहे. या धंद्यात नव्याने येणाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, थोडासा संयम आणि चिकाटी ठेवली तर या धंद्यात यश दूर नाही. (अधिक माहितीसाठी तुम्ही स्वप्निल शिंदे ला या क्रमांकावर संपर्क करू शकता, संपर्क स्वप्निल शिंदे -7744900490)