दुबार पेरणीचे संकट,राज्य सरकारने संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभ राहावं,शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत असतील तर त्याच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी त्याला यात्ना कशा देता येतील ही भूमिका आत्ताचे राज्यकर्ते घेत आहेत- शरद पवार
विक्रम वरे महान्यूज लाईव्ह
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर प्रथमच ज्येष्ठ नेते शरद पवार हे बारामती दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी बारामतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.
राज्यामध्ये ठराविक ठिकाणी पाऊस झाला परंतु दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे आहे. या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले, विशेषतः दुष्काळी भागामध्ये ही तक्रार फार मोठ्या प्रमाणावर आहे. ही वस्तुस्थिती आहे. आज बारामती सारख्या ठिकाणी टँकर लावायची वेळ आली आहे. काही ठिकाणी लोकांना छावण्या सुरू करण्याची मागणी करावी लागली. त्याचे मुख्य कारण पाऊस काही भागांमध्ये नाही. तर काही ठिकाणी पेरण्या झाल्या, पण पाऊस न पडल्यामुळे दुबार पेरणीचा प्रश्न आणि हे संकट शेतकऱ्यांवर आलं आहे. राज्य सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने बघावं आणि या संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभ रहावं असं शरद पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.
आत्ता टोमॅटोला चांगले दर आले आहेत आणि केंद्राने नेपाळ वरून टोमॅटो घेण्याचा निर्णय घेतला आहे या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले, दोन पैसे शेतकऱ्यांना मिळतात म्हटल्यावर परदेशातून माल आणण्याबद्दलची भूमिका केंद्र सरकार घेतं. याचा अर्थ स्वच्छ आहे, शेतकरी उत्पादक आहे. त्याला दोन पैसे मिळत असतील, तर अशा वेळेला त्याच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी आज त्याला यातना कशा देता येतील? ही भूमिका आत्ताचे राज्यकर्ते घेत आहेत आणि त्यामुळे अशा स्थितीत टोमॅटो आयात करणे हे म्हणजे शेतकऱ्यांना दुःख देण्यासारखं आहे. असंही शरद पवार म्हणाले.