• Contact us
  • About us
Thursday, September 21, 2023
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धैर्यशाली, शौर्यशाली, लोककल्याणकारी अहिल्यादेवी होळकर !

Maha News Live by Maha News Live
August 13, 2023
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, Featured
0

डॉ. श्रीमंत कोकाटे, इतिहास अभ्यासक

छत्रपती शाहू महाराज (पहिले) यांच्या प्रेरणेने देशभर मराठा साम्राज्य निर्माण झाले. त्यांनी दिलेल्या संधीमुळे अनेक कर्तृत्ववान घराण्यांनी पराक्रम गाजविला, त्यापैकी इंदौरचे होळकर हे पराक्रमी, लोककल्याणकारी आणि लोकप्रिय घराणे आहे. या घराण्यातील अत्यंत कर्तृत्ववान, करारी, स्वाभिमानी, निर्भीड, पराक्रमी, प्रजावत्सल, उत्तम प्रशासक, मुत्सद्दी महाराणी म्हणजे अहिल्याबाई होळकर ! 

पती निधनानंतर सती न जाता होळकरांच्या महान साम्राज्याचे रक्षण करून ते वृद्धिंगत करण्याचे महान कार्य अहिल्याबाईंनी केले. त्यांच्या जीवनात दुःखाची मोठी मालिका आहे. त्यांच्या जीवनात अनेक संकटे आली. उत्तर भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करणारे सासरे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे १७६६ साली निधन झाले. पती खंडेराव होळकर हे १७५४ साली कुंभेरीच्या वेढयात लढता लढता धारातीर्थी पडले. 

याप्रसंगी अहिल्याबाई फक्त २९ वर्षाच्या होत्या. एकुलता एक पुत्र मालेराव यांचे १७६७ अकाली अकाली निधन झाले. १७८७ साली नातू नथोबा,१७९१ साली जावई यशवंतराव फणसे आणि कन्या मुक्ताबाई मृत्यू पावले. इतके सर्व दुःख पचवून लोककल्याणासाठी अहिल्याबाई आयुष्यभर लढत राहिल्या. त्या हिंमतवान होत्या. संकटाने नाउमेद न होता, त्यांनी हिमतीने राज्यकारभार केला. त्या संकटसमयी लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या. वैधव्याने खचून न जाता, त्यांनी लोककल्याणकारी राज्य निर्माण केले. रयतेवर पुत्रवत माया केली.

अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी हे सीना नदी काठावरील त्यांचे गाव. ३१ मे १७२५ रोजी त्यांचा जन्म झाला. माणकोजी शिंदे यांच्या त्या कन्या. त्यांचा विवाह मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव होळकर यांचेबरोबर पुणे येथे झाला. शिंदेची कन्या होळकरांची सून झाली. 

अहिल्याबाई या लहानपणापासूनच अत्यंत हुशार, हजरजबाबी, विनयशील तितक्याच स्वाभिमानी आणि दयाळू होत्या. मल्हारराव आणि गौतमाबाई यांनी त्यांना मुलीप्रमाणे सांभाळले. मल्हारराव, खंडेराव यांनी पराक्रम गाजवावा आणि अहिल्याबाईनी दरबारचा कारभार चोखपणे सांभाळावा, असा राज्यकारभार चालू होता. अहिल्याबाईचा दरबारातील अधिकाऱ्यावर मोठा वचक होता. त्यांनी उत्तम प्रकारे राज्यकारभार केला. रयतेवर अन्याय होणार नाही याची त्यांनी खबरदारी घेतली.

अहिल्याबाईनी आपल्या राज्यातील सैन्याचा चोख बंदोबस्त ठेवला. त्यांचे आधुनिकीकरण केले. शस्त्रास्त्र साठा सुसज्ज ठेवला. त्यांचे गुप्तहेर खाते अत्यंत दक्ष होते. पुत्र मालेराव यांचे निधन झाल्यानंतर पुण्याचे राघोबादादा इंदौरचे राज्य गिळंकृत करण्यासाठी निघाले, तेव्हा अहिल्याबाईंनी ठणकावून सांगितले “आमचे दौलतीची अभिलाषा धरून सेनेसह आपण चालून आलात हे समजल्यावर बहुत कष्ट होत आहेत, पण ही दौलत आमच्या बापजाद्यांनी खुशमस्करी करून नव्हे, तर पराक्रम गाजवून मिळवलेली आहे. दान म्हणून मागत असाल तर दानधर्माचा वाटा मिळेल, पण युद्ध करून सर्व दौलत (राज्यच) समेटावे म्हणाल तर त्यालाही आमची तयारी आहे. माझ्यासंगे दोनशे स्त्रियांची हत्यारबंद फौज आहे. मी बाईमाणूस मानू नका. खांद्यावर भाला टाकून उभी राहील. माझा पराभव झाल्यास कोणी नावं ठेवणार नाही. उलट अटकेपार झेंडे लावणाऱ्याचा पराभव केला, म्हणून माझी कीर्ती होईल, पण तुमचा पराभव झाला तर तुमच्या सर्वत्र हसे होईल” 

अहिल्याबाईंचे हे करारी रूप पाहिल्यानंतर राघोबादादा पेशवा वरमला आणि सारवासारवीची भाषा करु लागला. “मालेरावांच्या मृत्यूमुळे सांत्वन करण्यासाठी आलो आहे”. असे उत्तर त्याने पाठवले. तेव्हा अहिल्याबाई म्हणाल्या “फौजेची गरज काय? एकटे पालखीत बसून यावे”. या प्रसंगावरून स्पष्ट होते की, अहिल्याबाई जशा राजशिष्टाचारामध्ये निष्णांत होत्या, तशाच त्या निर्भीड आणि स्वाभिमानी देखील होत्या. त्यांनी आक्रमण करणाऱ्या पेशव्यांचा देखील मुलाहिजा बाळगला नाही. घरात कर्ता पुरुष नाही म्हणून स्त्रीपणाचा न्यूनगंड त्यांनी बाळगला नाही. त्यांनी पुरूषांप्रमाणेच महिलांचेदेखील सैन्य उभारलेले होते. 

अहिल्याबाई स्वतः युद्धकलेत निपुण होत्या. त्यांनी आपले राज्य टिकविले आणि वाढविले. तुकोजी होळकर यांना सुभेदारी देऊन राजस्थानात मोहीमेवर पाठवले. त्या मोहिमेबाबतची माहिती गुप्तहेरामार्फत नियमितपणे घेत असत. तुकोजी होळकर यांना रसद, शस्त्रास्त्रे आणि सैन्याचा पुरवठा त्यांनी नियमितपणे केला. त्यांनी आपल्या राज्याचा स्वतः दौरा करून सुरक्षितता, 

कृषीव्यवस्था, करप्रणाली याबाबतची माहिती घेतली. रयतेच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना जरब बसवली. शेतसार्‍यात सवलती दिल्या. आपल्या राज्यात हुंडाबंदीचा हुकुम काढला. लग्नात हुंडा देणारे व घेणारे यांना दंड आकारला व दंडाची रक्कम सरकारात भरण्याची आज्ञा केली.

अहिल्याबाई धार्मिक होत्या, परंतु धर्मभोळ्या नव्हत्या, श्रध्दाळू होत्या पण अंधश्रध्दाळू नव्हत्या. यश मिळविण्यासाठी हातात तलवार घ्यावी लागते, रणांगण गाजवावे लागते, चातुर्य पणाला लावावे लागते, हे वास्तव त्यांना माहिती होते. आपल्या परंपरेचा त्यांना अभिमान होता. पण यश मिळवण्यासाठी दैवी शक्ती नव्हे, तर प्रयत्नवादच कामी येतो याची कल्पना त्यांना होती. 

त्या बुद्धिप्रामाण्यवादी होत्या. सती प्रथेला त्यांचा विरोध होता, परंतु धार्मिक दहशतवाद इतका कठोर होता की अनेक महिलांना सती जावे लागत असे. त्यांनी विधवांचा सन्मान केला. महिलांना सैन्यात संधी दिली. महिलाही शूर, पराक्रमी, उत्तम प्रशासक असतात, हे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी आपल्या राज्यात भेदभाव केला नाही. सर्व जातीधर्मीयांना अत्यंत मायेने वागवले. स्वतःच्या एकुलत्या एक कन्येचा -मुक्ताबाईचा- विवाह त्यांनी स्वयंवराप्रमाणे केला. 

एखाद्या राजघराण्यातील राजपुत्राला मुलगी देण्यापेक्षा आपल्या राज्यातील कर्तृत्ववान, निर्भिड गुणी तरुणाला त्यांनी आपली कन्या दिली. त्यांनी घोषणा केली  “जो तरुण दरोडेखोर, गुंडांचा, गुन्हेगारांचा बंदोबस्त करेल त्याच्याबरोबर मुक्ताबाईचा विवाह होईल”  यशवंतराव फणसे यांनी गुन्हेगारांचा बंदोबस्त केला, तेव्हा अहिल्याबाईनी मुक्ताबाईचा विवाह त्याच्याबरोबर लावून दिला. 

अहिल्याबाईंच्या या धोरणामुळेच पुढे अहिल्याबाईंच्या घराण्यातील यशवंतराव होळकर यांचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांचे कोल्हापूर गादीचे अधिपती राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांची बहीण रत्नप्रभादेवी यांच्याबरोबर निश्चित केला आणि तो पुढे मोठ्या आनंदाने संपन्न झाला.

अहिल्याबाईंनी आपल्या राज्यात आमूलाग्र बदल केला. प्रवाशांना लुटणाऱ्या दरोडेखोरांचा बंदोबस्त केला. त्यांना पडीक जमिनी देऊन त्यांच्या हाताला काम दिले. लुटारूंना संरक्षण खात्यात घेऊन प्रवाशांच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली व प्रवाशावर नाममात्र संरक्षण कर लावला व त्यातून त्यांच्या पगाराची व्यवस्था केली. गुन्हेगारांना मारण्यापेक्षा त्यांना उदरनिर्वाहाचे साधन दिली.

 अहिल्याबाईनी आपल्या राज्यातील व राज्याबाहेरील अनेक वास्तूंचा जीर्णोद्धार केला. त्यांनी महेश्वर, ओंकारेश्वर, सोमेश्वर, परळी वैजनाथ, श्रीशैलम, तारकेश्वर, काशी, त्रंबकेश्वर,घृष्णेश्वर, चारधाम, रामेश्वर, जगन्नाथ पुरी,  द्वारका, जेजुरी खंडोबा, पंढरपूर, मथुरा, बद्रीकेदारनाथ, गया, आलमपूर, रेणुका मंदिर, चौंडी, पुष्कर, उज्जैन इत्यादी ठिकाणी मंदिरे, घाट बांधले.ग्रामस्थ आणि यात्रेकरूंना नदीपात्रात उतरताना, चढताना, प्रवास करताना त्रास होऊ नये, म्हणून देशात अनेक ठिकाणी त्यांनी घाट बांधले. 

राज्यातील उत्पन्न कौटुंबिक हितासाठी नव्हे, तर प्रजेच्या कल्याणासाठी वापरणाऱ्या अहिल्याबाई या महान लोककल्याणकारी लोकमाता होत्या. त्यांच्या राज्यात भ्रष्टाचाराला थारा नव्हता. भ्रष्टाचार करणाऱ्याचा त्यांनी बंदोबस्त केला. प्रशासनावर त्यांचा वचक होता. कुटुंबातील व्यक्तींना देखील उधळपट्टी करण्याची त्यांनी कधीही संधी मिळू दिले नाही. अनेक वेळा त्या स्वतः हिशोब तपासत असत. स्वतःच्या राज्याबरोबरच इतर राज्यात देखील त्यांनी लोकोपयोगी कार्य केले.

अहिल्याबाईनी इंदौर बरोबरच महेश्वर या ठिकाणी भव्य राजवाडा उभारला. अनेक देवालय आणि स्मृतिस्थळ उभारले. त्यांचे भव्य असे ग्रंथालय होते. त्यामध्ये देश-विदेशातील असंख्य दुर्मिळ ग्रंथ होते. त्यांनी अनेक गुणी जनांना राजाश्रय दिला. त्यांचे कौतुक केले. बक्षीस देऊन त्यांना प्रोत्साहन दिले.  

फटका लिहिणारे नामवंत कवी अनंत फंदी यांना कविराज हा किताब देऊन त्यांना सन्मानित केले. गुणीजनांचा सन्मान करणे, त्यांना आधार देणे, याबाबत त्या दक्ष असत. त्या जशा करारी होत्या तशाच त्या दयाळू देखील होत्या. त्यांनी सिंहासनावर बसून राज्यकारभार केला. त्यांनी निपक्षपाती असा न्यायनिवाडा केला. त्यांनी घोड्यावर बसून रणांगण गाजविले. त्या न्यायनिष्ठुर होत्या. त्या धार्मिक होत्या, परंतु यशप्राप्तीसाठी पराक्रम गाजवावा लागतो याची जाण असणाऱ्या त्या विज्ञानवादी राज्यकर्त्या होत्या. त्या यशाने हर्षभरित होणाऱ्या आणि दुःखाने नाउमेद होणाऱ्या नव्हत्या.

स्त्री हिंमतवान, कर्तृत्ववान, बुद्धिमान, पराक्रमी, मुत्सद्दी, करारी, शूर, उत्तम राज्यकर्ती असते, हे अहिल्याबाईनी जगाला दाखवून दिले. विधवानी देखील इतिहास घडविला.हे आपल्या भारताच्या इतिहासामध्ये राजमाता जिजाऊ, राणी चन्नम्मा, रजिया सुलतान, राणी दुर्गावती, चांद बीबी, महाराणी ताराबाई, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, स्वातंत्र्यसेनानी हौसाअक्का पाटील इत्यादी कर्तृत्ववान महिलानी दाखवून दिले आहे.

अहिल्याबाई यांचे कार्य केवळ एका राज्यापुरते, एका जातीपुरते, देशापुरते मर्यादित नाही, तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आहे. त्या पराक्रमी, लोककल्याणकारी लोकमाता आहेत. अशा कर्तृत्ववान लोकमाताअहिल्‍याबाईंचा मृत्‍यू 13 ऑगस्ट १७९५ रोजी महेश्वर या ठिकाणी झाला. त्यांना सत्तर वर्षांचे आयुष्य लाभले. परंतु संपूर्ण आयुष्य त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी समर्पित केले. त्यांचा आज स्मृतिदिन, स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन ! 

Next Post

शरद पवारांच्या आजच्या विधानाने अजित पवार गटाची चिंता पुन्हा वाढवली! शरद पवारांनी पत्रकारांना देखील खडसावले! मुख्यमंत्र्यांबाबत म्हणाले, हे तर दुर्दैव!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अंकिता पाटील ठाकरे आता भाजप युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्ष!

September 21, 2023

महाराष्ट्रातलं बहुचर्चित राहणारं पार्टी ट्रस्ट यंदा सांगोल्यात बरं का!

September 21, 2023

प्रवीण माने तेथे दिसले..अन् सुरू झाली पुन्हा एकदा भैय्या नावाच्या वादळाची चर्चा..

September 21, 2023

इंदापुरात गावोगावी विकासपुरुषांचा हैदोस! ठेकेदारांना तर, भय कशाचे उरले नाही.. हा कसला विकास म्हणायचा?

September 21, 2023

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलकांचा खंडाळा घाटात दीड तास ठिय्या!

September 21, 2023

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना आनेवाडी टोलनाका प्रशासनाने मोफत पिण्याच्या पाण्याच्या
बाटलींचे वाटप केले!

September 20, 2023

वातुंडे गावातील हॉटेल व्यावसायिक व कामगाराजवळ मिळून आला अवैध गावठी पिस्टल, काडतूसाचा साठा!

September 20, 2023

दौंड मध्ये महा-ई-सेवा केंद्रात चोरी झाली.. सीसीटीव्ही पाहतो तो काय, केंद्रातलीच महिला कर्मचारी निघाली..!

September 20, 2023

बारामतीत अजब घडलं! गणरायाच्या आगमनादिवशीच बापाचा वाढदिवस.. पोरांनी बापाला एक मोठं गिफ्ट दिलं.. चक्क एका ताऱ्यालाच बापाचं नाव दिलं..! 

September 20, 2023

माळेगाव कारखान्याचे नवे कारभारी कोण? केशवबापूंच्या शेकडो समर्थकांनी गाठली देवगिरी!

September 20, 2023
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group