नाशिक : महान्यूज लाईव्ह
हल्ली प्रेम विवाह करण्याचे फॅड वाढले आहे, परंतु यातून भविष्यात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्याचबरोबर दोन्ही घरच्या कुटुंबीयांना देखील मनस्ताप सहन करावा लागतो. या सर्व पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील सायखेडा ग्रामपंचायतीने यापुढे गावात कोणी प्रेमविवाह करणार असेल, तर अगोदर दोघांनी आपापल्या आई-वडिलांची परवानगी आणावी असा ठराव केला आहे.
ग्रामपंचायत मध्ये विवाहाची नोंदणी करायची असेल तर अगोदर आई-वडिलांची परवानगी घ्यावी लागेल, याखेरीज नोंदणी कार्यालयात देखील परवानगी देऊ नये असा ठराव या ग्रामपंचायतीने केला आहे. अशा प्रकारचा ठराव करणारी सायखेडा ही पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.
या गावात जर आई-वडिलांचे पत्र आणले तरच ग्रामपंचायत विवाहाची नोंदणी करणार आहे, तसेच त्यांनाच विवाहाचा दाखला मिळणार आहे असा ठराव या ग्रामपंचायतीने केला आहे. या गावच्या ग्रामपंचायतचे सरपंच गणेश कातकाडे यांनी या संदर्भातील माहिती प्रसारमाध्यमांना दिली. राज्यात लव्हजिहादच्या घटनांना होणारा विरोध आणि त्यावरून सुरू असलेले सर्व राजकीय व धार्मिक स्थित्यंतर या सर्व पार्श्वभूमीवर सर्वच प्रेमविवाहांसाठी ग्रामपंचायतीने असा ठराव केल्याचे पहिल्यांदाच घडले आहे.