सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
ही कहाणी आहे, इंदापूर तालुक्यातील जाचकवस्ती या गावच्या भीमराव जामदार यांची! गळ्यात तुळशीची माळ आणि प्रवचनकार असलेले भीमराव जामदार तत्त्वनिष्ठ शेतकरी आहेत. गेले 30 वर्षांपेक्षा अधिक काळापासून ते दुधाचा व्यवसाय करतात. दुधाच्या व्यवसायामध्ये दूध संघ दूध प्रकल्पांकडून केली जाणारी चेष्टा आणि होत असलेली हरामी, त्यांना पटली नाही.
सतत दूध दरातील तीव्र चढउतार आणि आपण उच्च प्रतीचे दूध घालूनही प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत मात्र अतिशय खालच्या स्तराचे दूध पोचते, या गोष्टीने व्यथित झालेल्या जामदार यांनी स्वतःचे दूध स्वतःच विकण्याचा निर्णय घेतला. आज त्यांच्या गोठ्यातील दूध ते स्वतःच विकतात आणि शाश्वत व्यवसायावर भर देतात. गेल्या काही महिन्यांपासून जामदार यांनी निवडलेला हा पर्याय जामदारांना देखील दूध दराच्या योग्य त्या भावापर्यंत घेऊन गेला आहे.
महाराष्ट्रात दररोज एक कोटी 76 लाख लिटर दुधाचे संकलन होते. या दुधापैकी जवळपास 30 टक्के दूध हे इंदापूर तालुक्यात संकलन होते. मात्र जेव्हा आपण 4.0 फॅटचे दूध डेअरीला घालतो तेव्हा मात्र आपल्याला फक्त 30 ते 34 रुपये दर मिळतो. मात्र यातील सर्व क्रीम काढून 3.0 फॅटचे दूध प्रत्यक्ष ग्राहकापर्यंत पोहोचते, तेव्हा मात्र ते 70 ते 72 रुपये लिटरपर्यंत पोहोचते, म्हणजेच आपण ग्राहकांपर्यंत चांगले दूध पुरवण्याचा प्रयत्न करतो, मात्र प्रत्यक्षात ग्राहकांना दुधाची निवळीच मिळते या प्रकाराने गेले अनेक वर्ष ते अस्वस्थ होते.
ते इतर शेतकऱ्यांना देखील मार्गदर्शन करताना दुधाचे उत्पादन कसे वाढेल आणि ते अधिक दर्जेदार कसे बनेल, याविषयी मार्गदर्शन करतात. शेवटी त्यांनी आपला पर्याय आपणच निवडण्याचा निर्णय घेतला. ग्राहकांना दूध जर चांगल्या दर्जाचे मिळाले नाही, तर पुढील पिढी चांगल्या दर्जाची बनणार नाही, आपण किर्तन प्रवचनामध्ये खोट्या पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांच्या पाठीशी राहू नका असे सांगतो आणि प्रत्यक्षात आपणच याला एका अर्थाने हातभार लावत आहोत या गोष्टीने व्यतीत झालेल्या जामदार यांनी स्वतःच स्वतःचा व्यवसायातील उत्पन्नाचा भाग निर्माण करण्याचे ठरवले आणि त्यासाठी स्वतःचे दूध स्वतःच विकण्याचा निर्णय घेतला.
त्यासाठी त्यांनी सगळी साधने विकत घेतली. यामध्ये एक फ्रीजर, त्याचबरोबर पॅकिंग करण्याच्या मशीन आणि स्वच्छ दूध कसे तयार होईल यावर त्यांनी भर दिले. आज त्यांच्याकडे 100 ते 150 लिटर त्यांच्या गोठ्यात दूध उत्पादन होते. ते सर्व दूध पॅकिंग करून ते शीतगृहात ठेवून त्याची विक्री करतात. त्यांचे सर्व दूध हातोहात खपते. प्रतिलिटर 60 रुपये दराने पाण्याचा किंचितही अंश नसलेले आणि उच्च प्रतीचे दूध ग्राहक आवडीने घेतात.
जामदार हे गेली काही वर्षे गोवंशावर देखील संशोधन करत आहेत. त्यांच्या गोठ्यातील दुधाळ गाई गोठ्यातच जन्मलेल्या असून त्यांच्या जन्मापासून त्यांची दुधाळ उत्पादनाची उच्च प्रक्रिया कशी निर्माण होईल यावर त्यांनी भर दिला आहे. गीर आणि सहिवाल या दोन जातींच्या गाई उच्च प्रतीच्या दूध देणाऱ्या ठराव्यात यासाठी त्यांनी घेतलेले प्रयत्न, बायफच्या पाठबळावर घेतलेले आहेत असे ते आवर्जून सांगतात. त्यांच्या गोठ्यातील कालवडी तसेच त्यांच्या गोठ्यातील गाई यांचा संपूर्ण अभ्यास त्यांच्याकडे आहे.