सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
जसं शेतीमध्ये पिकतं ते विकण्यापेक्षा, विकतं ते पिकवण्याकडे शेतकऱ्यांचा कल सुरू आहे; तसाच शाळांमध्ये देखील फक्त पुस्तकी ज्ञानावर भर देण्यापेक्षा व्यवहारिक दुनियेतील वर्तमानकाळ विद्यार्थ्यांपुढे मांडणे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथील नागेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी अशाच प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांच्या अटल टिंकलिंग लॅबच्या साहित्याचा वापर करून चक्क एक ड्रोन बनवला आणि त्याची यशस्वी चाचणी देखील घेतली.
या परिसरातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी बनवलेला हा पहिलाच ड्रोन यशस्वी झालेला असून विद्यार्थ्यांचे परिसरात कौतुक होत आहे. शाळेचे प्राचार्य बी. आर. भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाचे शिक्षक राम तांबे यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांनी हा ड्रोन बनविला.
केवळ ड्रोनच नाही, तर सध्याचे विद्यार्थ्यांनी ड्रोन, स्मार्ट डस्टबिन,आय ब्लिंक सेंसर, थ्रीडी प्रिंटरच्या मदतीने अनेक मुर्त्या, सोलर गाडी यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूही बनवलेल्या आहेत. हा ड्रोन प्रणव सूर्यवंशी, समर्थ माळवे,अभिराज चोरमले,वैष्णव होलम राजवर्धन वाबळे या विद्यार्थ्यांनी हा ड्रोन बनवला असून त्यांचे कौतुक होत आहे.
विद्यालयाचे प्राचार्य बी आर भिसे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य सुभाष लकडे, जनरल बॉडी सदस्य हनुमंतराव वाबळे, स्कूल कमिटी सदस्य मानसिंग वाबळे, अनिल वाबळे, बाळासाहेब भोसले, सरपंच व ग्रामस्थांनी पालकांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले. दरम्यान भविष्यकाळात रयत शिक्षण संस्था व
नागेश्वर विद्यालयाच्या नावे पेटंट निर्माण व्हावे असे दर्जेदार संशोधन विद्यार्थी करतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे मत विद्यालयाचे प्राचार्य भिसे यांनी यावेळी व्यक्त केले