जीवन सोनवणे : महान्यूज लाईव्ह
खंडाळा – पुणे सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटानजिक असणाऱ्या धोम बलकवडी कालव्यामध्ये वाहनावरील ताबा सुटल्याने चारचाकी वाहन गेल्याची घटना घडली असून, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती नुसार, पुणे सातारा महामार्गावर धोम बलकवडी कॅनॉलमध्ये एर्टिगा गाडी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने आत कोसळली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्या ठिकाणी असणाऱ्या भोर तालुक्यातील प्रसाद पांडुरंग गोळे (रा.शिंध ता.भोर) व अजय कांबळे (रा.अजनूज) यांनी पाण्यामध्ये उडी घेतली.
या मदतकार्यात वाहनासोबत बुडत असलेल्या व्यक्तींना वाचवण्यात यश आले. दरम्यान या घटनेत दोघे किरकोळ जखमी असून त्यांना खंडाळा येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळी शेजारी गस्तीसाठी उपस्थित असलेले महामार्ग पोलिसाचे पोलीस उपनिरीक्षक गालींदे, मनोज गायकवाड बागल व कदम यांनी घटनास्थळी तत्काळ मदत उभी केली.