बारामती : महान्यूज लाईव्ह
1ऑगस्ट ते 10 ऑगस्ट 2023 या दरम्यान दक्षिण कोरियात पार पडलेल्या पंचविसाव्या आंतरराष्ट्रीय स्काऊट जांबोरी 2023 या कार्यक्रमात बारामतीतील सावळ येथील ज्ञानसागर गुरुकुल च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत भारताचे प्रतिनिधित्व केले.
25 वी आंतरराष्ट्रीय स्काऊट जांबोरी-2023 या आंतरराष्ट्रीय जांबोरीचे उद्घाटन दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती युन सीओक योल यांनी केले. या आंतरराष्ट्रीय जांबोरीत जपान, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, चीन, जर्मनी, फ्रान्स, इटली, तैवान, स्वीडन, स्वित्झर्लंड, नागालॅंड असे एकुण 58 देशातील 48 हजार स्काऊट आणि गाईड सहभागी झाले होते.
या जांबोरीत सांस्कृतिक कार्यक्रम, वेशभूषा, परेड रॅली, शारीरिक कसरत प्रात्यक्षिके, कुकींग असे अनेक कार्यक्रम उत्साहात पार पडले. यामध्ये विशेष आकर्षण ठरले, ते भारत देशाचे सांस्कृतिक कार्यक्रम! यामध्ये विशेषतः महाराष्ट्रातून बारामती तालुक्यातील ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, सावळ या शाळेतील सात विद्यार्थ्यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील नृत्य आविष्काराचे सादरीकरण केले होते.
या आंतरराष्ट्रीय स्काऊट जांबोरीत सहभागी विद्यार्थी भावना रावत, आदित्य चव्हाण, दिव्या आटोळे, संस्कार रायते, स्वयम कुंभार, प्रणव भरणे , अर्थव खताळ या सर्वांना महाराष्ट्र राज्य परिक्षा मंडळाच्या वतीने इ.10 वी व इ.12 वी च्या बोर्ड परिक्षेत 15 गुण वाढीव गुण म्हणून दिले जाणार आहेत.
आंतरराष्ट्रीय स्काऊट जांबोरी ही स्पर्धा दर पाच वर्षांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात येते. अशा आंतरराष्ट्रीय स्काऊट जांबोरीसाठी संपुर्ण महाराष्ट्रातून फक्त ज्ञानसागर गुरुकुलमधील या सात विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कार्य केले. शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर मानसिंग आटोळे व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.