जीवन सोनवणे : महान्यूज लाईव्ह
भोर : सातारा पोलीस असल्याचे भासवून भंगार व्यावसायिक लुटणाऱ्या संशयित आरोपी प्रफुल्ल प्रकाश पानसरे (वय 28 रा. पंचशीलनगर, पाटस ता.दौड जि.पुणे) याला स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शिंदेवाडी (ता. भोर जि. पुणे) गावच्या गोगलवाडी फाटा येथील बिस्मील्ला स्क्रॅप सेंटर येथे एका अनोळखी व्यक्तीने दुकानासमोर येवुन तांब्याच्या तारा विकायच्या आहेत. असे म्हणुन फिर्यादी यांना कारमध्ये बसवुन काही अंतरावर नेले.
त्या ठिकाणी मी सातारा जेल पोलीस आहे असे सांगून पिस्तूलचा धाक दाखवून फिर्यादीचे खिश्यातील 9 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर वरचे व केळवडे येथील पेट्रोल पंपावर घेऊन जावुन पेट्रोलपंपावरील कामगार याच्या मोबाईलवर फिर्यादी यांचे मोबाईलवरून फोन पे वरून 23 हजार रुपये व 5 हजार रुपये जबरीने पाठवण्यास भाग पाडले व कापूरहोळ येथे सोडून निघून गेला.
फिर्यादी यांना पिस्टलचा धाक दाखवुन एकुण 37 हजार 150 रूपये जबरीने काढून घेतले. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक करीत असताना सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीवरून सदरचा गुन्हा हा प्रफुल्ल प्रकाश पानसरे (वय 28 रा. पंचशील नगर ,पाटस ता.दौड जि. पुणे) याने केला आहे अशी माहिती मिळाली.
या माहितीचे अनुषंगाने प्रफुल्ल प्रकाश पानसरे यास ताब्यात घेतले असता गुन्ह्याबाबत कबुली दिली असून सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई कामी राजगड पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल व अपर पोलीस अधीक्षक बारामती आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, फौजदार प्रदीप चौधरी, राजू मोमीन, अतुल डेरे, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, मंगेश भगत, धीरज जाधव यांच्या पथकाने केली आहे.