दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली हद्दीतील आणि भिगवण जवळील प्रसिद्ध हॉटेल जय भवानी मच्छी खानावळचे मालक विशाल धुमाळ यांच्यावर कोयत्याने वार करीत प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात आरोपी शिवम कांबळे यांच्यासह चार अज्ञात व्यक्तींवर खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपासह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ही माहिती पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दौंड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत रावणगाव पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीतील स्वामी चिंचोली हद्दीत व भिगवण जवळ नायर पेट्रोलपंपाजवळ बुधवारी (दि ९) भिगवण येथील प्रसिद्ध हॉटेल जय भवानी मच्छी खानावळ चे मालक विशाल रामदास धुमाळ व राहुल ढवळे यांच्यावर दोन दुचाकी वरुन आलेल्या व्यक्तींनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
यामध्ये शिवम कांबळे याने कोयत्याने विशाल धुमाळ यांच्या पोटावर वार केला आणि दुसऱ्या अज्ञात तीन व्यक्तींनी विशालच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून मोटर सायकलवरून पाडले. विशाल धुमाळ हे गंभीर जखमी झाल्याने त्यांस बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
या प्रकरणी पानटपरी व्यवसायिक राहुल राजेंद्र ढवळे (रा. मदनवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने आरोपी शिवम कांबळे यांच्यासह चार अज्ञात व्यक्तींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेचा अधिक तपास दौंड पोलीस करीत आहेत.