सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूर हद्दीत पळसदेव गावानजीक आज पहाटे दोनच्या सुमारास एक मालवाहतूक ट्रक आगीत भस्मसात झाला ट्रकचे लायनर गरम झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती ट्रेकचालकाने दिली आहे मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
टिश्यू पेपरची वाहतूक करणारा हा ट्रक होता. पहाटे दोनच्या सुमारास पळसदेव नजीक आला असता, ट्रकचे लायनर गरम झाल्यामुळे ट्रकला अचानक आग लागली. हा ट्रक सोलापूरहून पुण्याकडे निघाला होता. पहाटे सव्वादोन च्या सुमारास लागलेली ही आग भिगवण च्या बिल्ट पेपर आणि ग्राफिक या कंपनी आणि इंदापूर नगरपरिषदेच्या दोन अग्निशामक वाहनांनी ही आग विझवली.
दोन वाजता लागलेली आग पहाटे पाच ते साडेपाच वाजता संपुष्टात आली. यादरम्यानच्या काळात महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यानंतर पोलिसांनी तातडीने वाहतूक वळवली आणि वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेमध्ये मालट्रकचे मोठे नुकसान झाले. ट्रक नंबर (के ए 56- 3831 हा सोलापूरहून पुण्याकडे निघाला होता. पळसदेवच्या पूलानजीक ही घटना घडली. यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही.