दौंड : महान्यूज लाईव्ह
आई- वडीलांना जिवे मारण्याची धमकी देत नववीतील विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे.
इस्माईल शब्बीर सय्यद (रा. बोरीभडक, ता. दौंड, मूळ रा. हागलूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) असे गुन्हा दाखल झालेल्या नराधमाचे नाव आहे. याप्रकरणी १५ वर्षीय पिडीत अल्पवयीन मुलीने बुधवारी (दि ८) यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिडीत मुलीलवर जुलै २०२३ ते ८ ऑगस्ट २०२३ या दरम्यान हा अत्याचार केला आहे.
आरोपी इस्माईल सय्यद हा पिडीत मुलीच्या घरी अधूनमधून जात होता. त्यामुळे पिडीत मुलगी आणि आरोपी याची ओळख होती. दरम्यान, इस्माईल सय्यद याने जुलै महिन्यात पिडीत मुलगी घरामध्ये एकटी असताना, घरात घुसून मुलीवर जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला तसेच तुझ्या आई-वडीलांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी त्याने पिडीत मुलीला दिली.
या धमकीने पिडीत मुलगी घाबरून गेल्याने तिने घडलेल्या प्रकाराची कोठेही वाच्यता केली नाही. त्यानंतर आरोपी वारंवार पिडीत अल्पवयीन मुलगी घरी एकटी असताना येत होता. आई-वडीलांना जिवे मारण्याची धमकी देवून जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवत होता.
दरम्यान, मंगळवारी (ता. ८) आरोपी सय्यद हा घरी आला. पिडीत मुलीशी लगट करू लागला. पिडीत मुलगी जोरात ओरडल्याने आरोपीने तिचे तोंड दाबले. त्यानंतर डाव्या हाताने खिशातून चाकू काढून मुलीच्या गळ्याला लावला व शारिरीक संबंध ठेवले नाही तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.
याप्रकरणी पिडीत मुलीने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी इस्माईल सय्यद याच्याविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम व अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मटाले करीत आहेत.