बारामती : महान्यूज लाईव्ह
ठाणे पोलिसांनी नोव्हेंबर 2016 मध्ये नागरी जमीन कमाल मर्यादा कायदा उल्लंघन केल्याबद्दल घोटाळा काढला होता, याचा तपास सुरू झाल्यानंतर आता मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्त पदी रुजू झालेल्या ढोले यांचेही या प्रकरणात नाव आल्याने, ढोले यांना नागरी जमीन कमाल मर्यादा नियमन कायदा घोटाळ्याप्रकरणी माहीती घेण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मीरा-भाईंदर महापालिकेत आयुक्त होण्यापूर्वी ढोले हे ठाणे महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त होते. त्यांच्या काळामध्ये घोटाळ्यातील संबंधित अधिकाऱ्याला क्लीन चिट देण्याचा मुद्दा देखील समाविष्ट असल्याची चर्चा सूत्रांकडून समजते. याच प्रकरणात युएलसीआर घोटाळ्याशी संबंधित माहिती घेण्यासाठी समन्स बजावण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
राज्यभरात सुरू असलेल्या राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार दिलीप ढोले यांना समन्स बजावलेले असले, तरी दिलीप ढोले यांच्या नथीतून इतर बड्या नेत्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा मारलेला तीर नाही ना? अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अर्थात या संदर्भात अधिक माहिती व प्रतिक्रियेसाठी ढोले कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.
दरम्यान यापूर्वीच आयकर विभागाने देखील ढोले कुटुंबातील एक सदस्य भागीदार असलेल्या पुणे जिल्ह्यातील एका कंपनीला आयकर विभागाने 14 कोटींची वसुलीची नोटीस बजावली होती, हे प्रकरण ताजे असतानाच आता ईडीचे समन्सदेखील आल्यामुळे चौकशीचे धागे तेथपर्यंत येण्याची व ढोले यांच्यापुढील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे