दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील जावजीबुवाची वाडी परिसरातील होले वस्तीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वर्ग शिक्षक अरविंद ज्ञानेश्वर देवकर यांनी विष पिऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या शिक्षकाच्या आत्महत्येची गुप्तचर यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करण्यात करुन संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .
दौंड तालुक्यातील होलेवस्ती ( जावजीबुवाचीवाडी जवळ ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपशिक्षक अरविंद ज्ञानेश्वर देवकर याने तणनाशक औषध पिऊन आत्महत्या केली आहे. ही घटना शालेय शिक्षण विभागाच्या कारभाराला काळिमा फासणारी आहे. अरविंद देवकर यांनी मृत्यूपूर्व चिठ्ठीत लिहिलेल्या सर्व बाबींची पोलीस प्रशासनाने व शालेय शिक्षण विभागाने सखोल चौकशी करावी.
शालेय शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा न पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच इतर काही स्थानिक लोकांनी वेगळा हेतू मनात ठेवून या शिक्षकाला मानसिक व शारीरिक त्रास दिला असल्याची माहिती मिळत असून त्या स्थानिक नागरिकांचीही सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी , अशी मागणी गौतम कांबळे यांनी निवेदनाद्वारे केली. या निवेदनाची प्रत प्रशासनाला देण्यात आले आहे.