इंदापूरात दुय्यम निबंधक कार्यालयात यावर्षी चा महसूल सप्ताह साधेपणाने साजरा.! नागरिकांना दिली शासनाच्या नवीन विविध योजनांची माहिती.. म्हसोबावाडी दुर्घटनेचे सावट जाणवले.. दुर्घटनेतील मृत कामगारांना कार्यालयाने वाहिली श्रध्दांजली..!!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूरातील दुय्यम निबंधक कार्यालयात यावर्षी चा महसूल सप्ताह साधेपणाने साजरा करण्यात आला.इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी दुर्घटनेचा परिणाम या सप्ताहावर झाला.म्हसोबावाडीच्या दुर्घटनेच्या वेळी महसुल विभाग घटनेच्या ठिकाणी कार्यरत असल्याने सप्ताहात कार्यालयीन कामावर तान पडल्याचे दिसून आले. मात्र कार्यालयाच्या माध्यमातून 1ऑगस्ट ते 7ऑगस्ट या महसूल सप्ताह काळात शासनाच्या नवीन विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली.
दरम्यान दुर्घटनेत मृत पावलेल्या कामगारांना दुय्यम निबंधक कार्यालयाच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली.यावेळी कार्यालयातील अधिकारी यांच्यासह कर्मचारी, पक्षकार,सर्व मुद्रांक विक्रेते, नागरिक उपस्थित होते.
महसूल विभागाने वर्षभर केलेल्या विविध लोकाभिमुख कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्यासाठी १ ऑगस्ट रोजी महसूल सप्ताह राज्यभरात साजरा करण्यात येतो. इंदापूर तालुक्यातही एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह साजरा साधेपणाने करण्यात आला. मात्र यंदा इंदापूर तालुक्यात व महाराष्ट्रातील जनतेच्या मनाला चटका लागून राहिलेली दुर्दैवी घटना घडली.
एक तारखेला तालुक्यातील म्हसोबावाडी गावची विहीर खोदकाम करताना चार मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.याचे परिणाम संपूर्ण तालुक्यावर याचे परिणाम दिसून आले. घडलेल्या घटनेच्या ठिकाणी तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांच्याबरोबर सर्व महसूल यंत्रणा कामासाठी मदत करत होती. परंतु या कार्यालयातर्फे मुक्त कालावधीमध्ये कार्यालयात येणाऱ्या पक्षकारांना नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवांबद्दल माहिती देण्यात आली.
दुय्यम निबंधक व्ही.बी.तपस्वी यांनी माहिती देताना सांगितले की, शासनाच्या महसूल बाबत नवीन योजना बरोबरच या सप्ताहात युवा संवाद, एक हात मदतीचा, जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी, महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबर संवाद साधला गेला. व सात ऑगस्टला महसुल सप्ताहाची सांगता करण्यात आली.
इंदापूर दुय्यम निबंधक कार्यालयाचे दुय्यम निबंधक व्ही.बी.तपस्वी यांनी या सप्ताहात नागरिकांना शासनाच्या महसूल विभागाने यावर्षीपासून जाहीर केलेल्या सवलतीच्या विविध योजनांची माहिती दिली. नोंदणी विभागामध्ये जेष्ठ नागरीक,अपंग, आजारी व्यक्ती, गर्भार माता यांच्या दस्तांना अग्रक्रमाने प्राधान्य दिले जाणार आहे. सलोखा योजनेच्या माध्यमातून एकमेकाला जमीन दस्त नोंदणीसाठी नवीन योजना अंमलात येत आहे.योजनेत सुसुत्रता आणण्यात आली आहे. या सलोखा योजनेत मुद्रांक शुल्कात माफी देत असताना फक्त एक हजार रुपयांच्या मुद्रांकावर दस्त नोंदणी करण्यात येणार आहे.
सदनिका खरेदी किंवा फ्लॅट खरेदीसाठी महिला खरेदीदारांना निवासी मिळकतीसाठी मुद्रांक शुल्कात एक टक्क्याची सवलत मिळणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी गहाणखतास पूर्ण माफी दिली जाणार आहे. विद्यार्थी यांचे करिता शपथपत्रास मुद्रांक शुल्कातून पूर्ण माफी मिळणार आहे. नवीन उद्योगासाठी च्या प्रथम दस्तास मुद्रांक शुल्कातून पूर्ण माफी मिळणार आहे.
शासनाच्या या सप्ताहाच्या अनुषंगाने ज्या काही सवलत योजना आहेत त्याच्या सर्वंकष माहितीचे फलक दुय्यम निबंधक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावण्यात आले आहेत. तत्पर सेवा देत जलद गतीने व विश्वासपूर्वक कामकाज दुय्यम निबंधक कार्यालय मार्फत केले जात असून याबाबत अधिक माहितीसाठी किंवा शासनाच्या दिल्या जाणाऱ्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन इंदापूर दुय्यम निबंधक कार्यालयाचे दुय्यम निबंधक व्ही.बी.तपस्वी यांनी केले आहे.