पुण्यातील साडेसतरा नळी परिसरातील पाणी प्रश्नसंबंधी अजितदादांच्या आदेशानंतर जलसंपदा विभागाकडून काही तासातच पुणे महापालिकेला ना हरकत पत्र सादर!
पुणे : महान्यूज लाईव्ह
साडेसतरा नळी आणि परिसराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जलसंपदा विभागाचे आवश्यक असलेले ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याची तक्रार हडपसरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर ‘तटस्थ’ असतानाही पवार यांनी तत्काळ जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केली. त्यामुळे काही तासांतच महापालिकेला जलसंपदा विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाले.
त्यामुळे येत्या काही दिवसांत साडेसतरा नळीचा पाणीप्रश्न सुटणार आहे. साडेसतरा नळी आणि परिसराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी जलसंपदा विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. गेल्या चार महिन्यांपासून ना हरकत प्रमाणपत्रासाठी जलसंपदा विभागाला निवेदने देण्यात येत होती.
निविदा प्रक्रियेनुसार काम करण्याचा कालावधी संपण्यास काही दिवस शिल्लक राहिले असल्याने काम पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यामुळे ही बाब साडेसतरा नळी येथील ग्रामस्थांनी आमदार तुपे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार तुपे यांनी शिष्टमंडळासह पवार यांची भेट घेतली. अवघ्या काही मीटर अंतराच्या कामासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याची तक्रार शिष्टमंडळाने केल्यानंतर पवार यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केली आणि सायंकाळी ना हरकत प्रमाणपत्र महापालिकेला मिळाले.