दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहरातील सिद्धार्थनगर येथे हातात धारदार कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना दौंड पोलिसांनी जेरबंद केले आहे. ही माहिती पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.
राकेश टिळक जगताप ( वय २८) व सचिन सुरेश नलावडे (वय ३०, दोन्ही रा.वडारगल्ली ता-दौंड जि-पुणे ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सोमवारी (दि ७) शहरातील सिद्धार्थ नगर येथे मोटार सायकलवरुन दोघेजण हातामध्ये धारदार कोयता घेवुन फिरत आहेत अशी माहीती पोलीसांना मिळाली.
पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीसांनी माहिती मिळाल्यावर ठिकाणी गेले असता, त्या ठिकाणी दोघेजण हातात कोयता घेऊन फिरत असल्याचे निदर्शनास आले, या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई अक्षय घोडके यांनी याप्रकरणी फिर्याद दिल्याने त्यांच्यावर भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून शस्त्र, तलवारी, दंड, काट्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेण्यास मनाई आहे. त्यामुळे कोणी असे बेकायदेशीर धारदार शस्त्र घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, अशा इशारा पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिला.