राजेंद्र झेंडे, दिल्ली
भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि दौंड भाजपचे आमदार राहुल कुल यांना भीमा पाटस कारखानाच्या कथित ५०० कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी क्लीन चीट ही दिलेली नाही. ही केवळ दिशाभूल करण्याचे काम आहे. खरं काय आहे, हे मी पुन्हा दौंडला येऊन सांगणार आहे. अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्ली येथे उपस्थित पत्रकारांची बोलताना दिली.
बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड तालुक्यातील पत्रकरांचा अभ्यास दौरा दिल्ली येथे आयोजित केला होता. यावेळी दौंड मधील पत्रकारांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या दिल्ली येथील सहा जनपथ निवासस्थानी भेट घेतली. याप्रसंगी बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीनिवास पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.
दौंड भाजपचे आमदार राहुल कुल अध्यक्ष असलेल्या भीमा पाटस कारखान्याच्या कथित ५०० कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केलेल्या एका प्रश्वांवर राज्य सरकारने राहुल कुल यांनी भ्रष्टाचार केला नसल्याचे सांगत एका प्रकारे क्लीनचीट दिली आहे.
यावर उपस्थित पत्रकारांनी खासदार संजय राऊत यांना या प्रश्नांवर विचारले असता ते म्हणाले की, कसली क्लीन चीट, क्लीन चिट वगैरे काही नाही हे फक्त दिशाभूल करण्याचे काम आहे, भीमा पाटस कारखान्यात शेतकऱ्यांच्या पैशावर आमदार कुल यांनी डल्ला मारला असून ५०० कोटींचा भ्रष्टाचार हा झालाच आहे यावर मी ठाम आहे, मी पुन्हा दौंडमध्ये येऊन खरे काय ते सविस्तर सांगणार आहे. असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट सांगितले. दौंडमध्ये पोलीस प्रशासन हे आमदार कुल यांच्या दबावाखाली काम करत आहे, याचा प्रत्यक्ष अनुभव मी दौंडमध्ये घेतला आहे. मात्र मी असल्या दबावाला घाबरत नाही असेही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.